उंब्रज : ‘खंडोबाच्या नावानं चांगभलं’, ‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या दुमदुमत्या जयघोषात, भंडारा-खोबऱ्याच्या उधळणीने पिवळाधमक झालेल्या तारळी नदीपात्रात भंडारा- खोबऱ्याची उधळण करण्यासाठी जमलेल्या लाखो भाविकांच्या साक्षीने आणि वेदमंत्रांच्या मंगल घोषात महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल (ता. कराड) येथील श्री खंडोबा-म्हाळसा यांचा पारंपरिक शाही विवाह सोहळा सायंकाळी गोरज मुहूर्तावर भक्तिमय वातावरणात मोठ्या थाटात संपन्न झाला.
श्री खंडोबा बोहल्यावर चढताना पाहण्यासाठी यंदाही भाविकांचा अथांग जनसागर पालनगरीत उसळला होता. प्रशासन, देवस्थान ट्रस्ट व यात्रा कमिटी यांच्या काटेकोर व शिस्तबद्ध नियोजनामुळे ही ऐतिहासिक यात्रा अत्यंत शांततेत पार पडली. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे. खंडोबा-म्हाळसा यांच्या शाही विवाहासाठी राज्य, परराज्यांतून आलेले मानकरी, मानाच्या सासनकाठ्या, मानाचे गाडे, पालखी आणि रथातून सहभागी झालेले मानकरी यामुळे पाल नगरीला जणू राजेशाही स्वरूप प्राप्त झाले होते. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांचे रथातून मंदिरात आगमन झाले. मंदिरातील विधी आटोपल्यानंतर सुमारे 3.45 वाजण्याच्या सुमारास देवराज पाटील यांनी देवास पोटास बांधून ते अंधार दरवाजाजवळ आले. तेथे रथात विराजमान झाल्यानंतर मुख्य शाही मिरवणुकीस प्रारंभ झाला.
फुलांनी सजविलेल्या छत्र्या, चोपदारांचा घोडा, सासनकाठी, पालखी, मानाचे गाडे आणि त्यामागोमाग रथातून विराजमान झालेले श्री खंडोबा-म्हाळसा असा भव्यदिव्य शाही सोहळा मुख्य चौकात दाखल होताच भाविकांनी भंडाराखोबऱ्याची उधळण करत ‘यळकोट यळकोट जय मल्हार’, ‘सदानंदाचा येळकोट’ आणि ‘खंडोबाच्या नावानं चांगभलं’चा गजर केला. मुख्य मिरवणूक तारळी नदीवरील पुलावरून दक्षिण पात्रात प्रवेश करताच लाखो भाविकांनी एकाचवेळी भंडाराखोबऱ्याची उधळण करीत खंडोबा-म्हाळसा यांचा जयजयकार केला. खचाखच भरलेले तारळी नदीचे दक्षिण पात्र अक्षरशः पिवळेधमक झाले होते. सायंकाळी मिरवणूक मारुती मंदिर मार्गे बोहल्याजवळ पोहोचली. यळकोट यळकोट जय मल्हार च्या जयघोषाने संपूर्ण पाल नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली होती.
देव मंडपात आल्यानंतर प्रमुख मानकरी देवराज पाटील यांनी पारंपरिक पद्धतीने देवास बोहल्यावर चढविले. गोरज मुहूर्तावर लाखो भाविकांच्या साक्षीने श्री खंडोबा-म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. देवस्थान ट्रस्टने राबविलेल्या शिस्तबद्ध दर्शन व्यवस्थेमुळे भाविकांना विनासायास दर्शन मिळाल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत होते.
यात्रा शांततेत पार पडल्याबद्दल पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील, व्हा. चेअरमन उत्तमराव गोरे, सचिव संजयकाका काळभोर, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, उंब्रज पोलीस ठाण्याचे स.पो.नि.रविंद्र भोरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, सरपंच सौ.सुनिता घाडगे, उपसरपंच गणेश खंडाईत, यात्रा कमिटीचे चेअरमन प्रशांत दळवी, ग्रामपंचायत प्रशासन व यात्रा कमिटी यांनी भाविकांचे आभार मानले.