सतीश मोरे
आपल्याला हवे तेव्हा आपल्याला हवी ती व्यक्ती येणे म्हणजे स्वर्ग आणि आपल्याला नको नसणारी व्यक्ती न जाणे म्हणजे नरक. व.पु. काळे यांच्या पार्टनर कादंबरीमधील हे वाक्य सर्वांना माहीत असेलच. इथे नरक आणि स्वर्ग ऐवजी नशीब आणि कमनशीब हे शब्द घालून कराडच्या निकालाकडे पहा. चांगलं वातावरण नसताना, परिस्थिती अनुकूल नसताना, उमेदवारसुद्धा मिळत नसताना अचानक नवीन गणिते जुळून येणे, एक नव्हे तर तब्बल 13 नगरसेवक निवडून येणे म्हणजे नशीब. आणि सर्व काही असूनही सत्ता न मिळणे व केवळ दहा नगरसेवक पदरी पडणे म्हणजे कमनशीब. दुसरी गोष्ट एखादं स्वप्न पाहिल्यानंतर त्या स्वप्नाच्या पाठीशी सलग राहिलं तर काय मिळू शकतं, या जगात कोणतीही गोष्ट अवघड नाही; मात्र ती गोष्ट मिळवण्यासाठीची जिद्द पाहिजे. ती असली तर सर्वकाही होऊ शकतं. नियोजन आणि त्या दृष्टीने तयारी याचं परफेक्ट समीकरण म्हणजे कराडचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव.
लोकशाही आघाडी कराडमधील सर्वात जुनी आघाडी आहे. ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांचे पुत्र, माजी मंत्री बाळासाहेब पाटील आघाडी प्रमुख आहेत. ही आघाडी अनेक वर्षे सत्तेत राहिलेली आहे; मात्र गेल्या पाच-दहा वर्षांत या आघाडीची परिस्थिती अतिशय गंभीर होती. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आघाडीच्या कार्यालयाकडे कोणी फिरकत नव्हतं. पंधरा प्रभागांत निवडणुकीला उभे करायला लोक कुठून आणायचे, असा प्रश्न पडलेला होता. मात्र नियतीच्या मनात वेगळंच होतं. संयम ठेवल्यानंतर किंवा आक्रमक न होता कधी कधी गप्प बसल्यानंतर काय फायदा होऊ शकतो, याचं उदाहरण म्हणजे लोकशाही आघाडी. शत्रूने केलेल्या चुका शोधणे किंवा शत्रूला चुका करायला लावणे, त्यांनी केलेल्या चुकांवर ‘चेकमेट’ करत आपलं नियोजन तयार ठेवणं- यालाच राजकारण म्हणतात. आणि ज्याला हे जमतं, त्याला धुरंधर राजकारणी म्हणतात. बाळासाहेबांनी हेच केलं. विधानसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव झाल्यानंतर बाळासाहेब पाटील यांनी ज्या पद्धतीने कमबॅक केला आहे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे. पराभवानंतर त्यांनी ज्या गोष्टी शिकल्या, त्या विजय मिळवणार्यांनी शिकायला पाहिजे होत्या.
यावर्षी पहिल्यांदाच लोकशाही आघाडीसमोर निर्माण झालेली परिस्थिती आणि पाटील कुटुंबातील वैयक्तिक अडचणींमुळे अनेक प्रश्न उभे राहिले होते. मात्र यावर मात करण्यासाठी स्वतः बाळासाहेब पाटील यांनी पुढाकार घेतल्यामुळे हळूहळू गोष्टी सुकर झाल्या. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला होता; मात्र लोकशाही ही आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवण्यावर ठाम होती, तर काँग्रेस हाताच्या चिन्हावरच निवडणूक लढवण्यावर हटून बसली होती. फक्त या एकमेव कारणामुळे हे दोन्ही माजी आमदार एकत्र येऊ शकले नाहीत. कारण नियतीच्या मनात वेगळ्याच गोष्टी होत्या. राजेंद्रसिंह यादव आणि लोकशाही आघाडी एकत्र आली. ही आघाडी एकत्र येताना राजेंद्रसिंह यादव यांची नगराध्यक्षपदाची अट लोकशाही आघाडीने तात्काळ स्वीकारली होती. लोकशाही आघाडी आणि यशवंत आघाडी यांना एकत्र निवडणूक लढवण्याचा आणि कारभार चालवण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी एकत्र येण्यात फार मोठ्या अडचणी आल्या नाहीत. जागावाटप या विषयावर कोणतीही ताणाताण झाली नाही. दोघांनी समन्वयाने जागा निवडल्या.
निवडणुकीला सामोरे जाताना एक मुद्दा सुरुवातीलाच फार मोठ्या प्रमाणात गाजला, जो पुढे अतिशय प्रभावी ठरला. लोकशाही आणि यशवंत आघाडी दोन्ही मिळून 31 जागा निवडणूक लढवणार होत्या; मात्र या उमेदवारीमध्ये ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या घरातील कोणीही व्यक्ती निवडणुकीला सामोरे गेली नाही. कुणालाही उभे केलेले नव्हते. हा विषय जनतेमध्ये फार चर्चेचा झाला. मात्र संभाव्य परिस्थितीचा विचार करून किंवा तत्कालीन परिसराचा विचार करून स्व. पी. डी. पाटील यांच्या घरातील सर्वांनी या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र कराडच्या सर्वांगीण विकासासाठी, शांततामय सहजीवनासाठी पी. डी. पाटील यांच्या घरातील सर्वजण या निवडणुकीत पूर्णपणे सक्रिय राहणार आहेत, असा निर्धार व्यक्त करून बाळासाहेब पाटील यांनी जी त्यागाची भूमिका दाखवली, त्याला जनतेमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
भारतीय जनता पक्षाला निवडणुकीचे चिन्ह आधीच मिळाले असल्यामुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती; मात्र मतदानाच्या अगोदर सहा दिवस लोकशाही आणि यशवंत आघाडीला चिन्ह मिळाले. हे चिन्ह जनतेपर्यंत कसे पोहोचवायचे, हा प्रश्न निर्माण झाला होता. ही जबाबदारी बाळासाहेब पाटील यांनी घेतली. प्रत्येक सभेत मतदान कसे करायचे हे पटवून समजावून सांगितले. प्रत्येक प्रभागातील उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी हे शिवधनुष्य हाती घेतले आणि या कामासाठी दोन्ही आघाड्यांच्या सर्व नगरसेवक उमेदवारांनी एकजुटीने काम केले. भाजपाच्या विरोधात असणारा अंडरकरंट आणि मराठा कार्डवरून निर्माण झालेला असंतोष याचा फायदा कसा घ्यायचा, किंवा हा विषय थेट प्रचारात न आणता हळूहळू जनतेपर्यंत कसा पोहोचवायचा, यावर बाळासाहेब पाटील आणि राजेंद्रसिंह यादव यांच्यात लेट नाईट झालेले ‘डेली कॉन्व्हरसेशन’ हळूहळू परिणामकारक ठरले. शहरातील मुस्लिम समाजाने घेतलेला वेगळा निर्णय यावर्षी पहिल्यांदाच प्रत्यक्षात उतरलेला दिसला. वास्तविक धर्माच्या किंवा जातीच्या नावाने कुणाला पाठिंबा देता येत नाही किंवा घेता येत नाही; मात्र कराड शहरातील मुस्लिम समाजाने 2016 च्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन विशिष्ट लाटेसोबत न जाता योग्य उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला.राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने अध्यक्षपदासाठी झाकीर पठाण यांना उमेदवारी दिली होती; मात्र मुस्लिम समाजाने काँग्रेसच्या पाठीशी न जाता केवळ राजेंद्रसिंह यादव यांना साथ दिल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. गेल्या अनेक वर्षांपासून यादव यांचे मुस्लिम समाजाशी असलेले घनिष्ठ संबंध आणि गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या घटनांमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मुस्लिमांच्या प्रश्नांसाठी घेतलेली सहकार्याची भूमिका याचा फायदा राजेंद्रसिंह यादव यांना मिळाला. लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी यांनी तब्बल सहा मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिली होती. याउलट भारतीय जनता पक्षाने कराडात एकाही मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी दिली नाही. नगराध्यक्ष पदासाठी अपेक्षित उमेदवार दिल्यामुळे भाजपच्या पाठीशी मुस्लिम समाज जाणार नाही, अशी परिस्थिती असताना भाजपने प्रभागातही एकाही मुस्लिम उमेदवाराला संधी न दिल्यामुळे मुस्लिम समाजात असंतोष निर्माण झाला. त्यामुळे पुन्हा एकदा समाजाने भाजपऐवजी आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. शहरातील मुस्लिम समाजाच्या मतदानाची आकडेवारी पाहता यादव यांना किती भरघोस मतदान झाले, हे स्पष्ट होते. झाकीर पठाण यांना मुस्लिम समाजाकडून अत्यल्प मतदान झाले. पठाण यांना झालेले मतदान आणि मतदान केंद्रे पाहिली, तर ती प्रामुख्याने ईदगाह मैदान परिसरातील दरवेशी वस्तीपुरती मर्यादित आहेत. उर्वरित संपूर्ण कराड शहरात झाकीर पठाण यांना एक हजार मतेही मिळाली नाहीत. मात्र यादव यांना मिळालेले मतदान पाहता, सुमारे आठ ते दहा हजार मतांचा फायदा मुस्लिम मतदारांकडून यादव यांना मिळाल्याचे स्पष्ट होते.
मराठा कार्ड सुरुवातीला न काढता एकनाथ शिंदे यांच्या कन्या शाळेसमोरील सभेत हे कार्ड काढण्याचे परफेक्ट नियोजन राजेंद्रसिंह यादव यांनी केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सायंकाळी चारला सुरू होणारी सभा रात्री नऊला सुरू झाली; तरीही सभेला मोठी उपस्थिती होती. एकनाथ शिंदे यांनी कराडमध्ये उमेदवार चिन्हावर नसतानाही सहभाग घेतला. या सभेतून त्यांनी दिलेला संदेश अतिशय प्रभावी ठरला.शिंदे यांनी मुस्लिम समाजातील एका महिलेला ऑपरेशनसाठी केलेली मदत भाषणात नमूद केली होती. त्यामुळे भाजपपेक्षा एकनाथ शिंदे मुस्लिम समाजाला अधिक जवळचे आहेत, असा संदेश या सभेतून गेला. कराड तालुक्यातील दोन मराठा नेत्यांनी खुल्या प्रवर्गातील उमेदवार असताना भाजपने ओबीसी समाजाला उमेदवारी का दिली, हा मुद्दा उपस्थित केला. हा मुद्दा पुढील दोन ते चार दिवस चर्चेत राहिला आणि त्याचा परिणाम मतपेटीतून लोकांनी दाखवून दिला. मतदानाच्या अगोदर एक दिवस दत्त चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. ही सभा मलकापूर आणि कराडसाठी संयुक्तिक होती. या सभेत शहरातील मतदारांपेक्षा मलकापूरमधील मतदारांची संख्या जास्त होती, हाही संदेश या माध्यमातून गेला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आ. डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन करताना, त्यांना सर्वांनी घेरले आहे, असे भावनिक आवाहन केले. मात्र ‘घेरले आहे’ या मुद्द्यावरूनच कराडमध्ये वातावरण बदलले आहे, याची जाणीव मुख्यमंत्र्यांना झाली असावी आणि निकाल पाहता तसेच झाल्याचे दिसून येते.राजेंद्रसिंह यादव यांच्या विजयानंतर कराडमधील संपूर्ण परिस्थितीचे विश्लेषण करताना किंवा भविष्यातील घडामोडींचा विचार करता, ही निवडणूक भारतीय जनता पक्षाला धोक्याचा इशारा आहे.
राजेंद्रसिंह यादव यांनी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला होता. त्यादरम्यान डॉ.अतुलबाबा भोसले यांनी फक्त विधानसभेसाठी सहकार्य करा, मला तुमच्या कराडच्या राजकारणात कसला इंटरेस्ट नसेल, असा शब्द राजेंद्रसिंह यादव यांना दिल्याच्या चर्चा आहेत. मात्र अतुल भोसले यांनी शब्द फिरवल्यामुळे राजेंद्र यादव यांना शिवसेना तथा आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेले. डावलले गेलेले किंवा उमेदवारी न मिळालेले जयवंतराव पाटील यांनी भाजपची साथ सोडून लोकशाही आघाडीचा झेंडा हाती घेतला. जयवंतराव पाटील हे कराडचे दिग्गज नेते आहेत. त्यांनी घेतलेल्या यूटर्ननंतर मंगळवार पेठेतील पाटील भावकी एकत्र आली. कराडमध्ये एक चांगले वातावरण निर्माण झाले आणि याचा परिणाम नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवर तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवारांवरही झाला. राजेंद्रसिंह यादव यांनी नगराध्यक्षपदाची स्वप्ने पाहताना त्या दृष्टीने गेल्या पंधरा ते पंचवीस वर्षांत त्यांनी आपला गट हळूहळू बांधलेला आहे. या गटातील काही जण निवडणुकीच्या तोंडावर त्यांना सोडून गेले असले, तरी लोकशाही आघाडीची ताकद यादव यांना मिळाल्यामुळे त्यांचे बळ दुपटीने वाढले.
गेल्या काही वर्षांतील नगरसेवकपदाचा अनुभव, यशवंत विकास आघाडी चालवण्याचा आलेला अनुभव आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणलेली विकासकामे यामुळे राजेंद्रसिंह यादव यांच्याबाबत कराड शहरात सुरुवातीपासूनच सकारात्मक वातावरण होते. यादव यांच्या तोडीचा उमेदवार भाजपने दिला असता, तर मोठी लढत झाली असती. मात्र भाजपने उमेदवारीमध्ये केलेली चूक आणि राजेंद्रसिंह यादव यांनी लोकशाही आघाडीसोबत केलेली युती यामुळे भाजपचे नगराध्यक्षपदाचे स्वप्न भंगलं. या निमित्ताने यादव यांच्या नेतृत्वगुणांचा कराडकरांना चांगला अनुभव आला. पूर्वीचे यादव आणि गेल्या पाच वर्षांत बदललेले यादव, तसेच त्यांनी शिवसेना गटात निर्माण केलेले वेगळे स्थान, यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबाबत चर्चा होऊ लागल्या. बहुमत आणि नगराध्यक्षपद एकाच आघाडीला दिल्यास कराडमध्ये चांगला विकास होईल. राजेंद्रसिंह यादव यांच्या निमित्ताने एक चांगले नेतृत्व पुढे आले आहे, अशी भावना निर्माण झाल्यामुळे कराडमध्ये या दोन्ही आघाड्यांना जनतेने भरभरून मतदान केले आणि विजयी केले.
राजेंद्रसिंह यादव यांची परफेक्ट उमेदवारी, लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीच्या उमेदवारांनी केलेले सूक्ष्म प्रचारनियोजन, प्रत्येकाने स्वतःचा प्रभाग सांभाळत चिन्ह घराघरात पोहोचवणे- यामुळे वातावरण पूर्णपणे आघाडीच्या बाजूने गेले. याउलट भाजपच्या अनेक प्रभागांतील उमेदवारांना शेवटच्या टप्प्यात वरचे मत मागण्याचीही संधी मिळाली नाही.एकसंघ लोकशाही आणि यशवंत विकास आघाडी विरुद्ध भेदरलेला भाजप- असे चित्र कराड शहरात निर्माण झाले आणि निकाल धक्कादायक लागला.