सातारा

‘कुस्ती आमुची शान… सातार्‍याचा अभिमान’

backup backup

सातारा पुढारी वृत्तसेवा: राजधानी सातार्‍यात 64 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आजपासून रंगणार आहे. दि. 9 एप्रिलपर्यंत होणार्‍या या स्पर्धेमुळे सातारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या नावलौकिकाला आणखी चारचाँद लागले आहेत. 'कुस्ती आमुची शान… अवघ्या सातार्‍याचा अभिमान' असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा तालीम संघ, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. सातार्‍यात दुसर्‍यांदा होणार्‍या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर 'दै. पुढारी'ने घेतलेला हा आढावा…

सातारा शहर म्हटलं की, अनेक जुन्या तालमीचं आगर आणि नामवंत पैलवानांचा शहर. ही ओळख अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून. पूर्वी सातारा शहरांमध्ये व्यायाम मंडळ, गुरुवार तालीम, पैलवान उमर तालीम, मारवाडी व्यायामशाळा येथे कुस्तीचे आखाडे रंगायचे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये उमर पैलवान हे व्यक्तिमत्त्व अगदी त्याकाळच्या उत्तरेतल्या भागामध्ये तसेच कराचीमध्ये जाऊन देखील कुस्त्या करत. त्याचबरोबर त्यांच्या नंतरच्या काळामध्ये अमृतराव पवार मास्तर हेदेखील स्वातंत्र्यपूर्व काळातले पैलवान.

1952 साली हेलसिंकी येथे सातार्‍याचे सुपुत्र श्रीरंग आप्पा जाधव, खाशाबा जाधव व त्यानंतर 1962 च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये गेलेले बाबुराव चव्हाण (काशीद) हे मोठे मल्ल तयार झाले. ग्रामीण भागांमधून परिस्थिती बिकट असताना देखील केवळ परंपरेने घरामध्ये असलेला कुस्तीचा वारसा जर का पुढे चालवायचा असेल तर त्यासाठी आधुनिक आणि पूर्णपणे नवीन तंत्रज्ञान कुस्तीत आत्मसात करण्यासाठी या मंडळींना कुठेही वाव मिळत नव्हता. त्यामुळे लढतीसाठी ही मंडळी शहराकडे येत होती. अशा परिस्थितीमध्ये ही मंडळी सराव करून नुसतेच ऑलिम्पिकला गेली नाहीत तर खाशाबा जाधव यांनी देशासाठी पदकदेखील आणले.

सातारा शहरांमध्ये त्या काळी व्यायाम मंडळामध्ये पैलवान धोंडीराम शिंगरे, चंदर गीते, निवृत्ती ढोणे ही मंडळी सराव करत होती. त्यानंतर मारवाडी व्यायाम शाळेमध्ये पैलवान बाबुराव चव्हाण, शिवाजीराव चव्हाण, साहेबराव पवार, किसनराव जाधव ही मंडळी सराव करत. त्याच बरोबर न्यू इंग्लिश स्कूल येथील भिडे गुरुजी व्यायाम शाळेमध्ये ऑलम्पिक वीर श्रीरंग आप्पा जाधव हे सराव करत होते. यामधून श्रीरंग आप्पा, धोंडीराम शिंगरे, साहेबराव पवार, निवृत्ती ढोणे, चंदर गीते यांची घट्ट मैत्री जमली. त्यांनी त्या काळामध्ये तालमीचा अतिशय मोठा संकल्प सोडला. साहेबराव पवार यांच्या वखारीमध्ये कमानी हौदाजवळ बैठक झाली आणि त्या बैठकीतून एक सूर निघाला की आपण स्वतःची एक तालीम निर्माण करायची. त्यासाठी या पाच जणांनी फार मोठे कष्ट घेऊन त्याकाळी आर. बी. जाधव म्हणजेच यांना घेऊन तत्कालीन मंत्री बाळासाहेब देसाई यांच्याकडे गेले आणि तालीम उभारणीसाठी साडेतीन एकर एवढी मोठी जमीन बाळासाहेब देसाई यांनी दिली. शिवाय तालीम उभारणीसाठी फार मोठी रक्कम देखील दिली. या प्रयत्नातून 1962 साली तालीम संघ सातारा आणि जिल्हा तालीम संघ सातारा अशा दोन संस्था जन्माला आल्या. तालीम संघ आता जिल्ह्याचा मानबिंदू झाला आहे.

आज साठ वर्षे झाली ही संस्था सातारा शहरामध्ये अत्यंत दिमाखाने आणि सतत कार्यरत आहे. साहेबराव पवार (भाऊ) हे या तालीम संघाची धुरा सक्षमपणे वहात आहेत. तालीम संघ कुठल्याही प्रकारची फी अथवा पगार न घेता, कोणतेही शासकीय अनुदान न मिळताही पैलवानांसाठी कार्यरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT