सातारा, पुढारी वृत्तसेवा : गरोदर मातांच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. असे असले तरीही जिल्ह्यात गरोदर मातांचा मृत्यू दर जास्तच आहे. गत तीन वर्षांत अपुर्या आरोग्य सुविधांमुळे 58 मातांनी आपला जीव गमावला आहे. 2020-21 मध्ये 21, सन 2021-22 मध्ये 19, सन 2022-23 मध्ये 12 तर सन 2023-24 मधील सहा महिन्यांत 6 मातांचा मृत्यू झाला आहे.
ही आहेत कारणे…
* गरोदरपणातील आरोग्य तपासणी न करणे
* वैद्यकीय सल्ला न घेणे
* घरीच बाळंतपण करणे
* अति रक्तस्राव होणे
* रक्तातील आवश्यक घटकांची उणीव
* अचानक वाढलेला रक्तदाब
* प्रसूतीनंतरचा जंतुसंसर्ग
अशा केल्या जातात तपासण्या अन् उपाययोजना …
१. सातारा जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत माता मृत्यूदर कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. दर महिन्याला समितीची माता मृत्यूबाबत आढावा बैठक घेतली जाते. गरोदर मातेची 12 आठवड्यांच्या पूर्वी नोंदणी व प्रसूतीपूर्वी गोळ्या व औषधे देवून विविध तपासण्या चार वेळा करण्यात येत आहेत.
२. मातेला धनुर्वात प्रतिबंधक लसीचे दोन डोस दिले जातात. लोहयुक्त, कॅल्शियमच्या व अल्बेंडॅझोलच्या गोळ्या देण्यात येतात. सर्व गरोदर मातेचे ईडीडी व ईपीडी व जोखमीच्या अवस्थेप्रमाणे संनियंत्रण केले जाते.
आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामीण रूग्णालय स्तरावर प्रसूती होण्याकरता पाठपुरावा केला जातो. तीव्र रक्ताशय असलेल्या गरोदर मातांना प्राथमिक
३. आरोग्य केंद्र व त्यावरील संस्थांच्या ठिकाणी औषधोपचार केला जातो.
४. गरोदर मातेसाठी महिन्याच्या प्रत्येक 9 तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान योजनेंतर्गत तपासणी करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी सांगितले.
* शासनाकडून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून महिलांना बाळंतपणापूर्वी व बाळंतपणानंतर 5 हजार रुपयांची मदत दोन टप्प्यांत दिली जाते. जननी सुरक्षा योजनेतून हॉस्पिटलमध्ये बाळंतपण झाल्यास 700 ते 500 रुपये दिले जातात. जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमातून गरोदरपणातील आवश्यक तपासण्या मोफत गेल्या जातात. 102 या टोल फ्री क्रमांकावरून गरोदर मातेला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध केली जाते.
* सातारा जिल्ह्यातील बहुतांश भाग हा दुर्गम भाग आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिलांना 84 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 400 आरोग्य उपकेंद्रे, 11 ग्रामीण रुग्णालय, 2 उपजिल्हा रुग्णालय व एका जिल्हा रुग्णालयामार्फत आरोग्य सुविधा पुरवल्या जातात. मात्र अजूनही खेड्यापाड्यासह दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचल्या नाहीत. त्यामुळे अनेकदा उपचारामध्ये अडचणी निर्माण होतात. तसेच गरोदर मातांना वेळेत उपचार मिळत नाहीत. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण अजूनही जास्तच असल्याचे आकडेवारी सांगते.