Mental Health Pudhari
सातारा

World Mental Health Day : ‘मी ठीक आहे’; अनेकांच्या आयुष्यातील मुखवटा

समाधानी दिसणारे अनेकजण आतून तणावग्रस्त : राज्यात सुमारे १ कोटी जण मानसिक नैराश्यावस्थेत

पुढारी वृत्तसेवा
विशाल गुजर

सातारा : 'आपण ठीक आहोत' हे वाक्य आज अनेकांच्या आयुष्यातील मुखवटा बनत चालले आहे. बाहेरून आनंदी आणि समाधानी दिसणाऱ्या अनेक व्यक्ती मानसिक तणाव, चिंता आणि नैराश्याशी झुंज देत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगातील सुमारे आठपैकी एक व्यक्ती मानसिक आरोग्याच्या समस्येचा सामना करत आहे. महाराष्ट्रातही परिस्थिती चिंताजनक असून राज्यातील एक कोटींच्या घरात नागरिक विविध स्वरूपांच्या मानसिक आरोग्यविषयक समस्यांनी त्रस्त आहेत. कोरोनानंतर वाढलेली चिंता, नैराश्य, कामाचा ताण आणि सामाजिक एकटेपणा यामुळे मानसिक आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

स्पर्धात्मक जीवनशैली, कामाच्या ठिकाणचा तणाव, कौटुंबिक कलह, आर्थिक अडचणी आणि सामाजिक अपेक्षांचा दबाव यांमुळे मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. तरुण आणि लहान मुलांमधील वाढता तणाव चिंतेचा विषय बनला आहे. शैक्षणिक स्पर्धा, करिअरविषयक अनिश्‍चितता आणि बदलती जीवनशैली यांचा मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत आहे. मात्र, मानसिक आरोग्याबाबत समाजात असलेला संकोच आणि गैरसमज यांमुळे अनेकजण वेळेवर उपचार घेण्यास पुढे येत नाहीत.

गेल्या तीन वर्षांत राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये आणि प्रादेशिक मनोरुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्यविषयक उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य सेवांचा विस्तार, तज्ज्ञांची उपलब्धता आणि समुपदेशन सुविधांना बळकटी देण्याची गरज अधोरेखित होत आहे. सध्‍याच्‍या घडीला राज्य सरकारकडून पुणे, ठाणे, नागपूर आणि रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयांसह जिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मानसिक आरोग्य उपचारांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

स्पर्धात्मक युग, आधुनिक जीवनशैली, कामाच्या ठिकाणचा तणाव आणि कौटुंबिक कलह यांमुळे नैराश्य व चिंतेसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. मानसिक आरोग्य आणि स्मृतिभ्रंश या दोन्ही क्षेत्रांत नागरिकांच्या समस्या वाढत आहेत. प्रशासन आणि समाजाने त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. प्रत्येक शहरात आणि जिल्ह्यात मानसिक आरोग्यविषयक कामकाजासाठी सक्षम यंत्रणा असणे गरजेचे आहे.
डॉ. चैत्राली प्रभुणे, मानसोपचार, तज्ञ्

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT