सातारा : अजिंक्यतारा किल्ल्यावरून पाय घसरून पडून नामदेव रमाजी गबाळे (वय 58) या वृद्धाचा मृत्यू झाला. सुमारे 200 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. किल्ल्यावर काम करत असताना ही दुर्दैवी घटना घडल्याचे समोर येत आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, अजिंक्यतारा किल्ल्यावर सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. यामध्ये किल्ल्याच्या तटबंदीचेही काम सुरू आहे. गबाळे हे किल्ल्यावर काम करत होते. काम करत असताना त्यांचा तोल गेल्याने ते खोल दरीत 200 फूट खाली कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी व बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रेस्क्यू टीमने खोल दरीत उतरून मृतदेह बाहेर काढला. यावेळी बचाव कार्यासाठी मोठी कसरत करावी लागली. शहर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.