File Photo
सातारा

जिल्ह्यातील ग्रा. पं. मध्ये आज महिला ग्रामसभा

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार दि. 8 मार्च रोजी जिल्ह्यातील 1 हजार 496 ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी दिली.

पिडीत महिलांच्या समस्यांचे निराकरण तसेच स्त्रियांवर परिणाम करणार्‍या कायद्यांचे परिणामकारकरित्या संनियंत्रण व अंमलबजावणी करणे स्त्रियांचा समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारणे, उंचावणे या बाबींवर शासनास सल्ला देणे हे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे मुख्य उद्दीष्ट आहे. पुरोगामी व प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असतानाही, विधवा महिलांना रुढी व अंधश्रध्देमुळे जाचक प्रथांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करत तातडीने उपाययोजना करणे तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक स्तरावर जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली आहे. गावातील बालविवाह रोखणे, पत्नीच्या निधनानंतर रुढी व अंधश्रध्देमुळे महिलांना जाचक असणार्‍या प्रथा बंद करणे, मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी प्रयत्न करणे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे याबाबतचे ठराव करण्यात येणार आहेत.

गावपातळीवर महिलांना सन्मानाने वागवणे हे आपले समाज म्हणून कर्तव्य आहे. ही भावना जनसामान्यांच्या मनात रुजवणेही गरजेचे आहे. जेणेकरुन भविष्यात महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून त्यांना सन्मानाची वागणूक मिळू शकेल, अशी महिला आयोगाची भूमिका आहे. त्यानुसार दि. 8 मार्च रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा घेण्याबाबतच्या सूचना सर्व पंचायत समितींच्या गटविकास अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT