Women’s Day special Pudhari
सातारा

Women’s Day special: कातकरी वस्तीत ‌‘तिने‌’ दिली शिक्षणाला ‌‘संजीवनी‌’

वस्तीतील वास्तव बदलून फुलवली ज्ञानाची ज्योत : स्वच्छतेपासून आरोग्यापर्यंत वाहिली काळजी

पुढारी वृत्तसेवा
मीना शिंदे

सातारा : आवड अन्‌‍ जिद्द असल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीतही चांगले काम करता येते. याच जिद्दीच्या जोरावर तिने कातकरी वस्तीमध्ये स्वच्छतेपासून सुरुवात करत अनेक आव्हाने पेलत अडचणीवर मात करत शिक्षणाचा प्रकाश पोहचवला. आरोग्यापर्यंत काळजी घेत शिक्षणाचा पाया भक्कम करणाऱ्या अंगणवाडीसाठी आता हक्काचा वर्ग अन्‌‍ सुरक्षित वातावरण मिळाले आहे. मागील 20 वर्षांपासून ‌‘ती‌’ कातकरी समुदायाला शिक्षणाची संजीवनी देत आहे. जिच्या नावातच संजीवनी आहे, ती परिस्थितीने डगमगून मागे कशी हटणार.

वाढे फाटा परिसरातील संजीवनी महेश फरांदे या अंगणवाडी सेविकेचा संघर्ष वाखाणण्याजोगा आहे. त्या मुलगी आजारी असताना ताप, सर्दीच्या गोळ्या संपल्यामुळे अंगणवाडीत गेल्या. योगायोगाने कातकरी वस्तीत जाण्याचा संबंध आला. तेथील वास्तव पाहून अभाव, अशिक्षीतपणा व अज्ञानामुळे ओढवलेली दयनीयता त्यांना अस्वस्थ करुन गेली. वाढेफाटा परिसर दिवसेंदिवस विस्तारत गेला आहे. अनेक भटक्या समुदायाच्या लोकांनी तेथे आश्रय घेतला. पुढे जावून त्यांना त्याच परिसरात घरकुले मिळाली. तर कुणी आपल्या खोपट्या मारल्या.

शासनाने प्राथमिक शाळा सुरु केली होती. मात्र, बालवाडी नव्हती. दोन तपापूर्वी त्या परिसरात एकच अंगणवाडी होती. त्याचे साहित्य या जि.प शाळेत ठेवण्यात येत असे. ते मिळण्यासाठी तिथे गेल्यावर वस्तीतील दयनीय अवस्था पाहून या मुलांना शिकवण्याची संजीवनी फरांदे यांना गरज वाटली. शाळेतील शिक्षकांशी बोलून बालवाडी सुरु करण्याची मागणी केली. कातकरी समाज असून आई -वडील बाहेर जाताना मोठ्या मुलांबरोबर छोट्या भावंडांना घेवून येतात. त्या लहान मुलांमुळे मोठ्या मुलांच्या अभ्यास व शिक्षकांच्या शिकवणीत व्यत्यय येत होता. त्यामुळे शिक्षकांनी बालवाडीसाठी लगेच सहमती दिली. त्यामुळे 2005 मध्ये शाळेच्या व्हरांड्यात बालवाडी सुरु झाली.

सकाळी व्हरांडा स्वच्छ करुन मग मुलांना बोलावून आणूण बसवण्यापासून बालवाडीची सुरुवात झाली. 30 ते 35 मुले जमू लागली. 0 ते 6 या वयोगटातील मुले होती. स्वत:चे लहान मूल मांडीवर घेवून ज्ञानादानाचे काम सुरु केले. पालक अशिक्षीत, अंधश्रध्देचा पगडा असल्याने कुपोषण या मोठ्या समस्या कातकरी वस्तीमध्ये होत्या. पण इथेच आपल्या कामाची जास्त गरज आहे, हे ओळखून संजीवनी यांनी बालवाडीत शिकवायचे ठरवले. प्रारंभी पालकांकडून थोडी वर्गणी काढून मानधन देण्याचा प्रयत्न होता. मात्र, पालकांची हलाखीची परिस्थिती पाहून मलाच ते नको वाटले.

शिकण्यापेक्षा येवून बसण्याची आवड निर्माण करुन मग त्याचे महत्व पालकांना पटवून देणे हे मोठे दिव्यच होते. मुलांमध्ये बालवाडीची गोडी वाढवण्यासाठी अनेकांच्या दातृत्वाची गरज होती. बालवाडीत बसल्यावर केवळ आपल्याला खाऊ मिळतो म्हणून येणाऱ्यांची संख्या जास्त होती. 2007 ला बालवाडी मंजूर झाली व त्याचे रुपांत अंगणवाडीत झाले. परंतु, वर्ग नसल्याने 14 ते 15 वर्षे व्हरांड्यात शाळा चालवली.

कातकरी वस्तीसाठी बांधण्यात आलेल्या समाज मंदिरात सध्या ही अंगणवाडी भरत आहे. संजीवनी फरांदे यांनी सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्ती यांच्या मदतीने या समाजमंदिरातील अंगणवाडीचे रुपडे पालटले आहे. आज या अंगणवाडीची चकचकीत रंगरंगोटी केली असून फळे, माहिती फलकांनी सजावट केली आहे. मुलांना खेळणी उपलब्ध करुन घेतली आहेत. त्यामुळे आदिवासी कातकरी वस्तीमध्ये आज शिक्षणाची संजीवनी मिळाली असून ज्ञानाचा प्रकाश दिसू लागला आहे. याआधी शाळेत न बसणारी कित्येक मुले आज विविध आश्रमशाळांमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT