परळी : सज्जनगडावर जायचे असेल, तर आता महिलांना स्टायलिश कपडे घालून जाता येणार नाही. ज्या महिला तोकडे कपडे घालून येतील, त्यांना सज्जनगडावर प्रवेश न देण्याचा निर्णय श्री रामदास स्वामी संस्थानने घेतला आहे. दरम्यान, धार्मिक परंपरेचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे संस्थानच्या वतीने सांगितले जात आहे.
रामदास स्वामी संस्थानच्या नवीन निर्णयामुळे या पुढच्या काळात महिलांना तोकडे कपडे घालून सज्जनगडावर जाता येणार नाही. स्टायलिश कपडे म्हणजे काय, याची व्याख्याही संस्थानच्या वतीने स्पष्ट केली आहे. त्यानुसार महिला, मुलींनी सज्जनगडावर येताना शॉर्ट पॅन्ट, शॉर्ट ड्रेस, स्लीव्हलेस ड्रेस आदि कपडे स्टायलिश कपड्यांमध्ये गणले जाणार आहेत.
सज्जनगड हे समर्थ रामदास स्वामींचे समाधीस्थान आणि महाराष्ट्रातील एक प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. परंतु, अलीकडच्या काळात काही पर्यटकांकडून गडावरील पवित्र वातावरणास बाधक वेशभूषेत फोटोसेशन, व्हिडीओ शूटिंग केल्याच्या तक्रारी संस्थानकडे वारंवार येत होत्या. या तक्रारींना गांभीर्याने घेत संस्थानने महिलांच्या पोशाखाबाबत नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.