सातारा : सातार्यात चेन स्नॅचर करणारे कोयत्याचा धाक दाखवून खुलेआम दागिने लुटत आहेत. गुरुवारी तर कहर झाला. या चोरट्यांनी संगमनगरमध्ये महिलेवर कोयत्याने हल्ला करत दीड तोळ्याची सोनसाखळी लांबवली. गेल्या चार दिवसांतील ही तिसरी घटना असून, सर्व घटनांमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांना लुटल्याने घबराट पसरली आहे.
सोनाली दीपक लोंढे यांच्यासह तीन महिला सकाळी 6.30 वाजता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या. संगमनगरात प्रतापसिंहनगर रस्त्यावर हार्मनी पार्क परिसरात तोंडाला रूमाल बांधलेले अंदाजे 30 वर्ष वयाचे तीन तरुण दुचाकीवरून आले. तीनही महिला एका पाठोपाठ चालत होत्या. दोन नंबरवरील सोनाली यांच्या जवळ आल्यानंतर चोरट्यांनी दुचाकी थांबवली. दोघे खाली उतरले. पाठीमागे बसलेला चोरटा कोयता उगारत सोनाली यांच्या दिशेने धावला. कोयत्याचा वार चुकवत सोनाली रस्त्याकडेला गेल्या आणि धावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या जमिनीवर कोसळल्या. ही संधी साधून चोरट्याने त्यांचे मंगळसूत्र हिसकावले. हा थरार पाहून अन्य दोन महिला घाबरुन जीवाच्या आकांताने पुढे जात एका इमारतीच्या गेटवरून आत उडी मारून जीव वाचवला. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. पोनि राजेंद्र मस्के यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाच्या सूचना दिल्या. प्रतापसिंहनगरामध्ये संशयितांचा शोध सुरू केला आहे.
पोलिस नक्की करताहेत तरी काय?
सातार्यात चेन स्नॅचर दिवसाढवळ्या महिलांवर कोयता उगारून लुटत आहेत. गेल्या आठवडाभरात त्यांनी प्रचंड दहशत माजवली आहे. आतापर्यंत एकांत व आडोसा पाहून होणारी लुटमार आता वर्दळीच्या रस्त्यावर आली आहे. त्यातूनच संगमनगर, सदरबझार व फॉरेस्ट कॉलनीत या चोरट्यांनी लुटमार केली. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध आहे. चोरट्यांचे हे धागेदोरे मिळाले असले, तरी कारवाईचे जुजबी सोपस्कार कागदोपत्री रंगवण्यापलिकडे तपास पुढे सरकतच नाही. त्यामुळे पोलिस नक्की काय करताहेत? असा संतप्त सवाल सातारकरांनी उपस्थित केला आहे.