वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील रांजणी येथे शुक्रवारी दुपारी शेतात शेळ्या चारत असताना विद्युतवाहिनीच्या आर्थिंगला धक्का लागल्याने विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुमन शिवाजी चव्हाण (वय 48) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी 3.40 वा. चे सुमारास रांजणी येथील शिरतोडे मळा येथे सुमन चव्हाण यांना शेतात शेळ्या चारत असताना विजेच्या आर्थिंगच्या तुटलेल्या तारेचा शॉक लागला. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची तक्रार सुर्यकांत दादा चव्हाण यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलिस ठाण्याचे सपोनि अक्षय सोनवणे, महिला पोलिस एम. एन. हांगे, महिला पोलिस हवालदार रुपाली फडतरे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तपास महिला पोलिस हवालदार एम. एन. हांगे, रुपाली फडतरे करत आहेत.