कलेढोण : कलेढोण आणि परिसरातील विकासकामे करण्यासाठी आपण कधीच कमी पडलो नाही. यामुळेच सभामंडप, अंगणवाडी बांधकाम, पाणी योजना, रस्ते, साखळी बंधारे, बंधारा दुरुस्ती, आरोग्य केंद्र इमारत, वीजपुरवठा, शाळेसाठी संरक्षक भिंती यासह अनेक कोट्यवधीची कामे पूर्णत्वास गेली आहेत. आजवर कलेढोणकरांनी नेहमीच आपली पाठराखण केली असून, इथून पुढेही या कामाची पोहोचपावती निश्चितपणे आपणाला मिळणार असून, कलेढोणमध्ये विकासकामांची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी दिली.
कलेढोणमधील रेवणसिद्ध मंदिरासमोरील उभारण्यात येणार्या सभामंडप कामाच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते. यावेळी मायणीचे उपसरपंच दादासाहेब कचरे, मार्केट कमीटीचे संचालक स्वप्निल घाडगे, उपसरपंच अरूण बुधावले, ग्रामपंचायत सदस्य राजुशेठ जुगदर, उस्मान तांबोळी, महेश पाटील, संजय महाजन, विजय शेटे, वसंत आतकरी, प्रकाश लिगाडे, मारुती दबडे, राहूल महाजन उपस्थित होते.
गुदगे पुढे म्हणाले, आजवर कलेढोणकरांनी आपणास नेहमीच साथ दिली आहे. गावातील कोणत्याही वाडीवस्तीवर आपल्या प्रयत्नातून काम झाले नाही असे पहावयास भेटणार नाही. डोंगरकपारीतील बंधार्याच्या दुरुस्तीपासून गावातील छोटी पाणीयोजना असूद्या, अशा सर्व कामासाठी आपण निधी दिला आहे. गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आपण कोणत्याही महत्त्वाच्या पदावर नसताना देखील लोकांच्या मागणीनुसार विकासकामे मंजूर करून आणण्यात कधीच कमी पडलो नाही. कार्यकर्त्यांनी मागेल ती कामे आपण पूर्ण करण्यात यशस्वी झालो आहे.
मारुती दबडे म्हणाले, मायणी पंचक्रोशीत विकासकामे करणारे गुदगे हे एकमेव नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांची कलेढोणकर पाठराखण करण्यात कुठेही कमी पडणार नाहीत. सूत्रसंचालन राहुल महाजन यांनी केले.