सातारा : माण-खटावचे युवा नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. नुकतीच सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपकडून शेखर गोरेंना उमेदवारी मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आम्ही तुम्हाला आमदार करतो,’ असा शब्द दिल्याची चर्चा त्या काळात कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही शेखर गोरेंना संधी मिळणार असल्याचे बोलले जात होते. मात्र अंतिम क्षणी राजकीय समीकरणे बदलली आणि त्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली होती.
आता सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने पुन्हा एकदा शेखर गोरेंच्या नावाची चर्चा रंगली आहे. येत्या 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार असल्याने महायुतीत उमेदवारीवरुन हालचालींना वेग आला आहे. सातारा-सांगली विधान परिषद मतदारसंघ हा पारंपरिकरीत्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मागील निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी नेते स्व.अजित पवार यांनी शेखर गोरेंना पक्षात घेत उमेदवारी दिली होती. त्यावेळी मताधिक्य असूनही अंतर्गत राजकारण व कुरघोड्यांमुळे ही निवडणूक कठीण बनली होती. अखेर काँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांनी विजय मिळवत शेखर गोरेंचा पराभव केला होता. यावेळी मात्र राजकीय चित्र वेगळे असल्याचे दिसत आहे.
राज्यात महायुतीची सत्ता असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र असले तरी सातारा जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील राजकारणात अजूनही अंतर्गत मतभेद कायम असल्याचे बोलले जाते. जिल्हा परिषद निवडणुकीपासून भाजप आणि महायुतीतील इतर घटक पक्षांमध्ये अनेक ठिकाणी राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. त्याचा परिणाम विधान परिषदेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शेखर गोरे सध्या भाजपच्या जवळ असल्याचे मानले जाते. त्यांना आमदारकीचा शब्द देण्यात आला होता, मात्र तो अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे यावेळी भाजप त्यांना उमेदवारी देऊन विधान परिषदेत पाठवणार की पुन्हा एकदा प्रतीक्षा करायला लावणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.