Uday Samant Pudhari
सातारा

Uday Samant | सातारा, सोलापूर जिल्ह्यातच तक्रारी का? : ना. उदय सामंत

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना लगावला टोला

पुढारी वृत्तसेवा

सातारा : महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक होत असून आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. पण, सातारा आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांतच तक्रारी का होतात? आपल्या वागण्याने महायुतीत कुठे मिठाचा खडा पडू नये अशी भूमिका घ्यावी, असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना लगावला. त्याचबरोबर आताच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्हीही कोकणबरोबरच सातारा-सांगली मतदारसंघाची मागणी केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

सातारा येथे शुक्रवारी शिंदेसेनेची सातारा लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठकीनंतर उद्योगमंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी खासदार राहुल शेवाळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर उपस्थित होते.

ना. सामंत म्हणाले, सातारा जिल्ह्यात बीएलओचे काम 100 टक्के झाले आहे. बीएलओच्या माध्यमातून ग्रासरुटपर्यंत पोहोचतो. आमचा पक्ष वाढवण्यासाठी महाराष्ट्रात फिरतोय. पक्षवाढीसाठी आम्ही काम करत आहोत. राज्यात निवडणूक होणाऱ्या 17 विधान परिषद मतदारसंघांचा तिढा सुटला आहे. उद्यापर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. या सर्व 17 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास आहे. दरम्यान, शिंदेसेनेचे आमदार असूनही महेश शिंदे हे बैठकीला उपस्थित नाहीत? असा प्रश्नही पत्रकारांनी केला. यावर मंत्री सामंत यांनी शिंदेसेनेचा कार्यक्रम असताना निमंत्रण द्यायची आवश्यकता नसते. कारण शिंदेसेना हे एक कुटुंब आहे. ज्याला पटते ते येतात. ज्याला पटत नाही ते येत नसतील, असे स्पष्टपणे सांगितले.

पुणे येथे विषारी दारू पिल्याने काही लोकांचा मृत्यू झाला आहे, या प्रश्नावर मंत्री सामंत म्हणाले, दारूत मिथेनॉल मिक्स होते असे समजले. पण, असे अड्डे उद्ध्वस्त केले पाहिजेत. पोलिसांनीही कारवाई करायला हवी. कारण, 13 माणसे मेल्यानंतर कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT