पुसेसावळी : अलीकडच्या काळात किशोरवयीन मुलांमध्ये चोरी, मारामारी, व्यसनाधीनता आणि गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. हे केवळ कायद्याचे अपयश नाही, तर संपूर्ण समाजाच्या आरशात दिसणारे आपलेच प्रतिबिंब आहे. आजच्या समाजात वाढती गुन्हेगारी ही एक गंभीर समस्या बनली आहे. विशेषतः लहान वयातच गुन्हेगारीकडे वळणारी पावले पाहून काळजाला धडकी भरते. कुठे चुकते आहे आपले समाजजीवन, याचा प्रामाणिक विचार करण्याची आज गरज आहे.
गुन्हेगारीची बीजे ही अनेकदा बालपणातच पेरली जातात. योग्य संस्कार, मूल्ये आणि शिस्त घरातूनच दिली पाहिजे. मुलांमध्ये कायद्याची भीती नसून कायद्याबद्दल आदर असावा, हे घरातून आणि शाळेतून शिकवले पाहिजे. पालकांनी, शिक्षकांनी व समाजाने मिळून मुलांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.
कायद्याचा कडक निर्बंध नसेल तर गुन्हेगारांचे धाडस वाढते. काही झाले तरी शिक्षा होणार नाही असा समाजातला समज तोडला गेला पाहिजे. लहान गुन्ह्यांवर वेळेवर कारवाई न केल्याने मोठ-मोठे अपराध जन्म घेतात. कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. मग तो सामान्य नागरिक असो वा एखादा प्रभावशाली राजकारणी. आज अनेकदा कायद्याची अंमलबजावणी निवडकपणे होताना दिसते. प्रभावशाली व्यक्ती, राजकीय आश्रय असलेले गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यातून सुटतात, तर सामान्य नागरिकांवरच कायद्याचा दबाव येतो. ही विषमता गुन्हेगारांच्या धाडसाला खतपाणी घालते. कायद्यापुढे सर्व समान आहेत ही जाणीव समाजात पक्की झाली पाहिजे.
राजकारणी जर समाजहिताचे आदर्श ठेवतील तरच तरुणाई योग्य दिशेने जाईल. सत्ता टिकवण्यासाठी गुन्हेगारांना साथ देणे थांबवले तर गुन्हेगारीला आळा घालता येईल. गुन्हेगार केवळ शिक्षा भोगून सुधारतातच असे नाही. योग्य मार्गदर्शन, शिक्षण, व्यसनमुक्ती आणि पुनर्वसनाच्या संधी उपलब्ध झाल्या तर अनेक जण मुख्य प्रवाहात येऊ शकतात. म्हणूनच, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दंड आणि सुधारणा या दोन्ही उपायांची सांगड घालावी लागेल. लहान वयातच गुन्हेगारीकडे वळणारी पावले हे केवळ कायद्याचे अपयश नाही, तर समाजातील संस्कारांची उणीव आणि राजकारणातील भ्रष्टतेचे प्रतिबिंब आहे.
चुकीच्या वाटेवर जाण्यापासून मुलांना रोखा
गुन्हेगारी फक्त पोलिसांनी थांबवायची गोष्ट नाही, ती थांबवण्यासाठी प्रत्येकाने समाजहिताचे वर्तन केले पाहिजे. घरच्यांनी मुलांना चुकीच्या वाटेवर जाण्यापासून रोखले पाहिजे. समाजानेही अपराध्यांना पाठीशी घालण्याऐवजी त्यांना सुधारण्याचा, शिक्षा होण्याचा मार्ग मोकळा करून देणे गरजेचे आहे.