सातारा : सातारा जिल्ह्यातील सर्व पालिकांमधील नूतन नगराध्यक्षांनी चार्ज स्वीकारले असताना राजधानी साताऱ्यात विक्रमी मतांनी निवडून आलेल्या अमोल मोहिते यांनी अद्यापही चार्ज न स्वीकारल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. मोहिते हे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक असल्याने त्यांच्याबाबत उदयनराजे गटाची भूमिका गुलदस्त्यात दिसत आहे.
जिल्ह्यातील सर्वच नूतन नगराध्यक्षांनी अध्यक्षपदाचा चार्ज स्वीकारला आहे. आजवरच्या प्रथेनुसार निवडून आल्या आल्या नगरपालिकेत जाऊन नगराध्यक्ष चार्ज घेत खुर्चीवर बसतात. मोहिते मात्र थेट ‘सुरुचि’वर गेले. त्यांनी चार्ज स्वीकारला नाही. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले पुण्यात असल्याने मोहितेंनी चार्ज स्वीकारला नसल्याचे समजते. त्यातच सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले हेही कॅबिनेट बैठकीसाठी मुंबईला गेले आहेत.
दुसरीकडे उदयनराजे गटाचे जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु आहे. अपक्षांना सोबत घेवून लॉबींग सुरु झाल्याचेही चित्र निर्माण झाले आहे. उदयनराजे गटाची सातारा नगरपालिकेतील ताकद वाढली आहे. त्यामुळे मोहिते उदयनराजे व शिवेंद्रराजे एकत्र असतानाच चार्ज स्वीकारतील असे बोलले जात आहे. साताऱ्यात मात्र अमोल मोहिते केव्हा चार्ज स्वीकारणार याविषयी उत्सुकता आहे.