सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या 4 महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग सक्रिय झाला आहे. जिल्हा परिषद गट व गणांची नव्याने पुनर्रचना करण्याचे आदेश देण्यात आल्याने सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये गलबला सुरू झाला आहे.
पुनर्रचनेमुळे सुमारे तीन वर्षांपूर्वीच्या रचनेत वाढलेल्या गट व गणांचे काय होणार? याबाबत जिल्ह्यात उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, गट व गणांचे आरक्षणही नव्याने काढण्यात येणार आहे. मागील 3 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. त्यामुळे राजकीय पदाधिकार्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र, अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता आगामी 4 महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षाच्यावतीने तयारी सुरू करण्यात आली आहे.
त्यातच आता निवडणूक आयोगाने देखील या निवडणूका लवकरात लवकर घेण्यासाठी कंबर कसली आहे. यात आता राज्य शासनाला फेर प्रभाग रचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाच्यावतीने देण्यात आले आहेत.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये सन 2017 साली 64 गट व 128 गण होते. मात्र सन 2022 साली नव्याने जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची रचना करण्यात आली. त्यामध्ये सातार्यात 10 गट व 20 गण, कराड 14 गट व 28 गण, वाई 5 गट व 10 गण, महाबळेश्वर 2 गट व 4 गण, माणमध्ये 5 गट व 10 गण, खटावमध्ये 8 गट व 16 गण, कोरेगावमध्ये 6 गट व 12 गण, जावलीमध्ये 3 गट व 6 गण, खंडाळ्यामध्ये 3 गट व 6 गण, पाटणमध्ये 8 गट व 16 गण, तर फलटण मध्ये 9 गट व 18 गण असे मिळून नव्याने 73 गट व 146 गण निर्माण झाले. सन 2017 च्या तुलनेत नवीन रचनेनुसार 9 गट व 18 गणाची वाढ झाली. त्यामध्ये 45 गट खुला प्रवर्गासाठी तर 19 गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी, 8 गट अनुसूचित जातीसाठी, 1 गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले.
मात्र, निवडणूक आयोगाने पुन्हा राज्य शासनास जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची नव्याने पुनर्रचना करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता नव्याने फेररचना होणार असल्याने गट व गणात गलबला उडाला आहे.
निवडणुकीत ओबीसी आरक्षणासंदर्भात बांठिया आयोगाच्या पूर्वीची स्थिती असणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये ओबीसीचे पूर्ण आरक्षण लागू असणार आहे. गट आणि गणाची रचना झाल्यानंतरच पुन्हा नव्याने आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवू इच्छिणार्यांमध्ये कालवाकालव सुरू झाली आहे. नव्या प्रभाग रचनेत गट-गणाचे काय होणार? याची उत्सुकता लागली आहे.