Mahabaleshwar News: कुठे नेऊन ठेवलंय महाबळेश्वर आमचं? Pudhari Photo
सातारा

Mahabaleshwar News: कुठे नेऊन ठेवलंय महाबळेश्वर आमचं?

जनतेसह पर्यटकांचा सवाल : मुख्याधिकाऱ्यांविरोधात संतापाची लाट

पुढारी वृत्तसेवा
प्रेषित गांधी

महाबळेश्वर : काही वर्षांपूर्वी स्वच्छतेत देशपातळीवर कोट्यवधींची पारितोषिके मिळवलेल्या ‌‘स्वच्छ, सुंदर व निसर्गरम्य महाबळेश्वर‌’ या ओळखीला प्रशासकीय काळातील मनमानी कारभार आणि मर्जीतील ठेकेदारांना दिलेल्या पायघड्यांमुळे आता ‌‘अस्वच्छ, बकाल व गलिच्छ महाबळेश्वर‌’ अशी ओळख मिळू लागली आहे.

महाबळेश्वर पालिकेच्या गल्ली-मोहल्ल्यांमधील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय, पडझड व अस्वच्छ अवस्था पाहता ‌‘कुठे नेऊन ठेवलंय महाबळेश्वर आमचं?‌’ असा सवाल उपस्थित होतो. ठेकेदारांच्या गर्तेत राहणाऱ्या, विशिष्ट लोकांचे लांगुनचालन करणाऱ्या व स्वच्छतेच्या ठेक्यात ठराविकांना मॅनेज करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात महाबळेश्वर शहरात संतापाची लाट उसळली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील अस्वच्छतेसह पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आणि ठेकेदाराच्या अकार्यक्षमतेवर ताशेरे ओढले जात असतानाही अधिकारी वर्ग अद्याप निद्रावस्थेत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. झोपी गेलेले महाबळेश्वरकर जागे होणार तरी कधी, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. देशपातळीवर नंदनवन अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरने राज्य व देशपातळीवरील अनेक पारितोषिके पटकावली होती. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतही शहराने चमकदार कामगिरी केली होती. ‌

‘कचरामुक्त शहर‌’ म्हणून तीन-तारांकित (3-स्टार) मानांकन, तसेच ‌‘हागणदारीमुक्त‌’ (ओडीएफ++) शहराचा दर्जा मिळवला होता. माझी वसुंधरासह विविध स्पर्धांमध्येही महाबळेश्वरने उल्लेखनीय कामगिरी केली होती. मात्र प्रशासकीय काळात या कामगिरीवर जणू काळा डाग लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे. लिंगमळ्यापासून वेण्णालेकपर्यंत तसेच शहरातील प्रमुख ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. अशी एकही जागा उरलेली नाही जिथे अस्वच्छता दिसत नाही. प्रत्येक गल्ली, बोळ, मोहल्ला आणि चौकात पालिका व ठेकेदाराच्या अभद्र युतीमुळे ‌‘जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी‌’ अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे ही ‌‘स्वच्छतागृहे‌’ नसून ‌‘अ-स्वच्छतागृहे‌’ झाली आहेत. विशेषतः स्कुल मोहल्ल्यासारख्या भागातील एकमेव स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. तुटलेली दारे-खिडक्या, मोडकळीस आलेली भांडी, प्रचंड घाण, कचऱ्याचे ढिगारे, वाहणारे सांडपाणी आणि अंधाराचे साम्राज्य यापेक्षा वाईट परिस्थिती काय असू शकते? शौचास बसायचे असल्यास दाराला हात लावून बसावे लागेल, अशी भयावह अवस्था असल्याचे नागरिक सांगतात. या स्थितीस पालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधीही जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.

देशभर स्वच्छ भारत अभियान राबवले जात असून, स्वच्छतेबाबत जनजागृती, अनुदान व विविध स्पर्धांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहेत. मात्र महाबळेश्वरची या स्पर्धांतील कामगिरी गेल्या काही वर्षांत खालावली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची परिस्थिती पाहता पालिका अधिकारी कुचकामी ठरत असल्याचे स्पष्ट होते. ठेकेदाराकडून जर स्वच्छताच होत नसेल, तर ही स्वच्छतागृहे नेमकी कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे. स्वच्छतेसाठी मिळणाऱ्या निधीतून केवळ दिखाव्यासाठी केलेले कार्यक्रम काय उपयोगाचे, असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत.

मर्जीतील ठेकेदाराला बहाल केलेली महाबळेश्वरची स्वच्छता व्यवस्था ठेकेदाराच्या अकार्यक्षमतेमुळे शहराच्या वाटोळ्याला कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे. नूतन नगराध्यक्ष सुनील शिंदे शहराच्या सर्वांगीण विकासासह स्वच्छतेसाठी आग्रही असतानाही अधिकारी त्यांच्या ध्येयधोरणांना हरताळ फासत असल्याचे दिसते. स्वतः नगराध्यक्षांनी शहरातील सर्व गल्ली-बोळांमध्ये फिरुन या विदारक स्वच्छतागृहांची पाहणी करावी, अशी जोरदार मागणी महाबळेश्वरवासीयांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT