प्रकाश गायकवाड
कोरेगाव : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत वाठार (किरोली) गट यावेळी सर्वसाधारण महिला राखीव झाला. तर दुसरीकडे गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण झाल्याने इच्छुक उमेदवारांना धक्का बसला आहे. यामुळे निवडणुकीसाठी तयारी सुरू असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. यामुळे माजी जि.प. सदस्य भीमराव काका पाटील यांचा पत्ता कट झाला आहे. यामुळे इच्छुकांना आता सौभाग्यवतींना मैदानात उतरवावे लागणार आहे. तर आर्वी गण खुला झाल्याने अनेकांना लॉटरी लागली आहे.
आ. मनोज घोरपडे व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचे सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत मनोमिलन न झाल्याने निवडणुकीत आलेले अपयश व त्यानंतर भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये गावोगावी पडलेली उभी फळी पाहता त्यांचे मनोमीलन होणार का? झाले तरी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत त्यांची एकीपूर्वी इतकी ताकत भक्कम असणार का? असाही प्रश्न आहे. भाजपा अंतर्गत असणाऱ्या मतभेदावर तोडगा कोण व कसा काढणार, यावरही बरीच राजकीय समीकरणे अवलंबून आहेत. महायुतीचा घटक पक्ष अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांचीही तितकीच महत्त्वाची जबाबदारी राहणार असल्याने त्यावरच महायुतीचे यश- अपयश अवलंबून राहणार आहे.
वाठार (किरोली) गटात सर्वसाधारण महिला प्रवर्ग राखीव झाल्याने आज पर्यंत गट गणावर वर्चस्व असणारे तारगाव येथील सह्याद्री कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल पाटील, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती भीमराव काका पाटील व ज्येष्ठ पदाधिकारी संभाजीराव गायकवाड हे त्यांच्या त्यांच्या पक्ष संघटनेच्या अस्तित्वाच्या दृष्टीने आपल्या घरातील उमेदवारी देणार की कार्यकर्त्यांचा सन्मान करणार याकडे लक्ष लागले आहे.
वाठार किरोली गट हा सर्वसाधारण महिला राखीव झाल्याने नव्या चेहऱ्यासाठी संधीचे वारे आहे. महाविकास आघाडी, महायुती यासह अपक्षांचे पीक येण्याची शक्यता आहे. भीमराव पाटील काका यांच्या कार्यपध्दतीमुळे त्यांना मानणाऱ्या लोकांची फळी आहे. त्यामुळे ते त्यांची पत्नी सौ. शैलजा गायकवाड- पाटील यांच्यासाठी पर्याय ठेवतील, अशी शक्यता आहे.
ज्येष्ठ नेते कांतीलाल पाटील यांनाही मानणारा गट असून त्याही पत्नी संध्याराणी पाटील यांच्यासाठी इच्छूक असल्याच्या चर्चा आहे. बाळासाहेब पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते संभाजीराव गायकवाड यांच्या पत्नी लक्ष्मी गायकवाड यांनाही मैदानात उतरवण्याचा विचार करू शकतील. याचबरोबर नव्या इच्छुकांमध्ये सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले, विष्णुपंत कणसे, गणेश गायकवाड, विकास गायकवाड यांच्या कुटुंबातील महिला व सौ. अनिता घाडगे या इच्छुक असल्याची चर्चा आहे.
आर्वी गण हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाल्याने गणात इच्छुक वाढले आहेत. यामध्ये आर्वीचे उपसरपंच प्रकाश पाटील, नागझरीचे सरपंच जितेंद्र भोसले, पिंपरीचे विष्णुपंत कणसे, तात्यासाहेब साबळे, अनंत साबळे, ऋषिकेश तुपे, सोमनाथ निकम, राहुल विठ्ठल निकम, अनंत साबळे, बोरगावचे संजय घाडगे, सुर्लीचे विजय गायकवाड, हणमंत भोसले अशी मोठी यादी आहे.
वाठार किरोली गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव असून तारगाव येथील दत्तात्रय कुदळे, माजी सरपंच सौ. संध्या मलवडकर, माजी पंचायत समिती सदस्य रुक्मिणी जगताप, अनिता पोतदार इच्छुक आहेत. नव्या चेहऱ्यांना संधी देणे अथवा मातब्बर नेत्यांना पुन्हा संधी देण्याचा सर्वस्वी निर्णय हा युती व आघाडी तसेच वरिष्ठ नेते यांच्यावर अवलंबून आहे. उमेदवार निवडीपूर्वीच गावोगावी कार्यकर्ते व नागरिकांच्या पारावरील गप्पाने जोर धरला आहे. त्यामुळे येणारा काळच उमेदवार ठरवेल असे दिसते.