सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसाने निसर्ग सौंदर्य बहरू लागले आहे. पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक गर्दी करु लागले आहेत. गटागटाने येणारे तरुण धबधब्याच्या ठिकाणी स्टंटबाजी करत असल्याने लाखमोलाचे जीव कस्पटासारखे जाऊ लागले आहेत. रविवारी कास पठाराजवळील एकीव धबधब्याजवळ झालेल्या घटनेने काळजाचा ठोका चुकला. दोघांना जीव गमवावा लागला असून, या घटनेपासून बोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणचे धबधबा परिसर धोकादायक बनले आहेत. एकीव धबधबा पर्यटकांसाठी पर्वणी असून, सुरक्षेच्या उपाययोजना केल्यास पर्यटकांना इथे आनंद लुटता येणार आहे.
ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी आलेले काहीजण जीव धोक्यात घालत आहेत. हा धबधबा पाहताना दरीत कोसळून आतापर्यत 12 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याची खबरदारी घेत येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीने धबधबा परिसरास रेलिंग करून घेत प्लेव्हर ब्लॉकही बसवले. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मात्र, अनेक हुल्लडबाज सुरक्षा कवच भेदत रेलिंगमधून पाणी पातळीत उतरण्याचा धोका पत्करत आहेत.
पर्यटनस्थळी टोळक्यांचा धिंगाणा आता नवा राहिला नाही. पर्यटनाला म्हणून जायचे व दुसर्यांनाही त्रास द्यायचा असे उद्योग वाढले आहेत. धबधबा पाहण्यासाठी येणारे अन्य पर्यटक त्यामुळे त्रस्त होत असून टोळक्यांच्या भांडणतंट्यामुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटनाला बट्टा लागत आहे.
पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, सुरक्षा रक्षक उपलब्ध करणे, ठिकठिकाणी सूचनाफलक लावणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यास मनाई करणारे फलक लावणे, नदीकाठी फोटो काढण्यास मनाई असल्याचे फलक लावणे, अशा विविध उपाययोजनांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यात विविध पर्यटनस्थळे आहेत. पावसाळ्यात या भागात ट्रेकिंग करण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. या सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फॉरेस्ट गार्ड व गावातील स्वयंसेवकांमार्फत गस्त घातली पाहिजे. धोकादायक ठिकाणांची माहितीही पर्यटकांना देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज आहे.
पर्यटनस्थळी निसर्गाचा आनंद न लूटता मद्यप्राशन करणे हे एक फॅडच निर्माण झाले आहे. आडोसा किंवा वेगळा पॉईंट दिसला की मद्यप्राशन करायला बसलाच. सर्वच पर्यटन स्थळावर मद्याच्या बाटल्यांचा ढीग, सिगारेटची पोकिटे दिसत आहेत.
निषिद्ध क्षेत्र, धोक्याची ठिकाणे, अशा प्रकारचे बोर्ड लावणे, बॅरिकेड्स् लावणे, धोक्याच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यासोबतच कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तीय हानी होणार नाही, असे नियोजन करून पर्यटनस्थळी उपाययोजना करण्याची गरज आहे.
धोम, कण्हेर, उरमोडी या धरणांवरही असे प्रकार सर्रास सुरू आहेत. एकीकडे धरणाचे पाणी तर सभोवती हिरवागार डोंगर त्यामुळे पर्यटकांसह मद्यपी याठिकाणी सकाळपासून रात्रीपर्यंत ठिय्या मांडलेलेच आहेत. याठिकाणी अनेकजण मद्यप्राशन करून धिंगाणा घालताना दिसत आहेत.
प पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबा परिसर, दर्यांचे कठडे, धोकादायक वळणं अशा ठिकाणी सेल्फी काढणे किंवा कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे. प धबधब्यावर धोकादायक ठिकाणी जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहात उतरणे व पोहणे. प धबधब्यावर स्वत:सह इतरांना इजा पोहचेल असे कोणतेही कृत्य करणे. प पर्यटनस्थळी व धबधब्याच्या परिसरात मद्यपान, भांडण तंटा करणे. प वाहतुकीचे रस्ते आणि धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे.