खटाव : केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांनी जनतेच्या जीवनात स्थिरता आणली आहे. आज गावोगावी विकासाचे मोठे पर्व उभे राहिले आहे. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून माण-खटाव मतदारसंघात अमूलाग्र कायापालट होत आहे. पाणी योजनांची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. आता औंधसह 21 गावांच्या योजनेची मान्यता होवून तीन वर्षात या योजनेचे पाणी देणार, असा शब्द ना. जयकुमार गोरे यांनी दिला. आम्ही कधी जातीपातीचे राजकारण केले नाही. माण-खटावची मातीच आमचा स्वाभिमान असल्याचेही त्यांनी विरोधकांना ठासून सांगितले.
कुरोली येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी अंकुश गोरे, सोनिया गोरे, जि.प.च्या उमेदवार भारतीताई गोरे, शहाजी देशमुख, दादासाहेब इंगळे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
ना. गोरे पुढे म्हणाले, माण-खटावच्या जनतेने माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील युवकावर विश्वास ठेवून चार वेळा आमदार आणि आता राज्याचे मंत्री केले आहे. अथक प्रयत्नांनी दुष्काळी माण- खटावला विकसित करण्याचा शब्द पूर्णत्वाला निघाला आहे. इथल्या जनतेलाच नव्हे तर नेत्यांनाही विचारात घेतले जात नव्हते, मात्र आता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाची पाने माझ्या माण-खटावमधून हलू लागली आहेत.
अहोरात्र जनतेची सेवा करत उरमोडी, जिहे-कठापूरचे पाणी आणलेय. टेंभूची कामे प्रगतीपथावर आहेत. शेतकरी बागायती शेती करु लागले आहेत. कारखाने सुरु झाले आहेत. औंधसह 21 गावांची पाणीयोजना पूर्ण करण्यासाठी कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही. आता माझ्या मतदारसंघात एमआयडीसी होत आहे. शक्तीपीठ महामार्ग मतदारसंघातून जात असल्याने विकासाची अनेक दालने खुली होणार आहेत.
भारतीताई गोरे म्हणाल्या , भाजप सरकारच्या विकासाभिमुख कारभारावर विश्वास ठेवून सभेस उपस्थित असणारा महिला भगिनी आणि अबालवृध्दांचा जनसमुदाय पाहता भाजपाच्या सर्व उमेदवारांना साथ देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.