शंभूराज देसाई  File Photo
सातारा

पर्यटन महोत्सवात वॉटर स्पोर्टस, टेंट सिटीचे आकर्षण

ना. शंभूराज देसाई : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पर्यटन विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने महाबळेश्वर येथे प्रथमच ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. दि. 2 ते 4 मे या कालावधीत होणार्‍या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात नेत्रदीपक लेझर शो, वॉटर स्पोर्टस् आणि टेंट सिटी आकर्षण असणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात पर्यटन महोत्सव होत आहे. या महोत्सवात पर्यटकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाबळेश्रमधील वेण्णा तलावात महोत्सव कालावधीत नेत्रदीपक लेझर शो होणार आहे. गुजरातमधील कच्छ रणच्या धर्तीवर शंभरहून अधिक टेन्ट्स उभारण्यात येणार आहेत. पर्यटकांसाठी अत्याधुनिक निवासव्यवस्थेकरिता टेंट सिटी उभारली जाणार आहे. वेण्णा तलावात पर्यटकांना साहसी खेळ आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येईल. देशभरातील पर्यटन उद्योगातील तज्ज्ञ, ट्रॅव्हल एजंट्स आणि गाईड्स यांचा एक विशेष परिसंवाद देखील आयोजित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि पर्यटनदृष्ट्या त्यांचे योगदान यावर विशेष सादरीकरण देखील होणार आहे. दि. 3 मे रोजी साबणे रोड येथे एक सांस्कृतिक मिरवणूक काढण्यात येईल. या महोत्सवात राज्यातील प्रत्येक भागातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद पर्यटकांना घेता येणार आहे. 4 मे रोजी समारोप सोहळ्यापूर्वी महाराष्ट्रातील विविध पारंपरिक लोककला जसे की लावणी, गोंधळ, जागर, नाशिक ढोल इत्यादींचे सादरीकरण होणार आहे. याचबरोबर भव्य ‘ड्रोन शो’ या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे. महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत, असेही ना. देसाई म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT