सातारा

Javali water crisis: जावली तालुक्यात पाणी टंचाईचे सावट

44 गावे, 25 वाड्यांना झळा : प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरु

पुढारी वृत्तसेवा

मेढा : जावली तालुक्यात उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पाणी टंचाईचे संकट गडद झाले असून तब्बल 44 गावे व 25 वाड्या-वस्त्यांना पाण्याच्या दुर्भिक्षाचा सामना करावा लागत आहे. मात्र या परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. विविध योजना राबवून गावांची तहान भागवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आर. बी. साठे यांनी दिली.

जावली तालुक्यात कुरळोशी, मोरघर, रेंगडी, भामघर, गवडी, केंडबे, भूतेघर, सांगवी तर्फ मेढा, कारगाव, वालुथ, सावली, ओखवडी, भोगवली, केळघर, करंदोशी, रिटकवली, भिवडी, महामुलकरवाडी, बेलावडे, कावडी, आपटी, भालेघर आदी गावांसह वारणेवस्ती, धनगरपेढा, सह्याद्रीनगर, शिंदेवस्ती, माणेवस्ती, कोकरेवस्ती, आंबवडे, पिसाडी, कात्रेवाडी, खिलारपुरा, मांटीमुरा अशा वाड्यांमध्ये पाणी टंचाईची तीव्रता जाणवत आहे.

जानेवारी ते मार्च 2024 दरम्यान 12 गावे व 14 वाड्या टंचाईग्रस्त होती, तर एप्रिल ते जून 2024 या कालावधीत ही संख्या वाढून 32 गावे व 11 वाड्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे एकूण 44 गावे व 25 वाड्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. नव्या विहिरी अधिग्रहणासाठी 18 प्रस्तावांपैकी 10 योग्य ठरले असून त्यापैकी काहींना मंजुरी मिळाली आहे. मोरघर येथील खाजगी विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून संबंधित विहिरीतून पाणी पुरवठा सुरू करण्याची तयारी आहे.

दरम्यान, मोरावळे व आखेगणी या गावांकडून पाणीटंचाई जाहीर करण्याचे प्रस्ताव प्राप्त झाले असून आतापर्यंत 13 गावे व 10 वाड्यांना टंचाईग्रस्त म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. पाणीटंचाईचे संकट गंभीर असले तरी प्रशासन विविध उपाययोजना राबवत असल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, कोणत्याही गावात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू नये यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने उपाय केले जातील, असे अधिकारी साठे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT