दहिवडी : माण तालुक्यात तारळी प्रकल्पाचे आलेले पाणी दारे उघडून पळवण्याचे प्रमाण वाढले आहे. गावागावांत वाढत चाललेली भांडणे लक्षात घेऊन तेढ आणखी वाढू नयेत म्हणून प्रशासनाने संबंधित आठ गावांत जमावबंदी आदेश लागू केले असल्याची माहिती प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी दिली.
माण तालुक्यातील वळई, जांभुळणी, पुळकोटी, गंगोती, पानवन, देवापूर, पळसावडे आणि शिरताव या गावांमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कालव्यावरील पाणी पळवण्याच्या घटनांमुळे पाणी नियोजन बिघडत आहे. तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता हा आदेश माण-खटावच्या उपविभागीय दंडाधिकारी यांनी जारी केला आहे. तारळी प्रकल्पांतर्गत माण तालुक्यात वाढीव कालवा व अंत्यवितरक कालव्यांमध्ये सुरु असलेल्या पाणी आवर्तनादरम्यान काही गावांमध्ये दरवर्षी वारंवार दारे उघडून पाणी पळवण्याचे प्रकार घडत आहेत.
यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 (2) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. हा आदेश दि. 24 एप्रिल 2025 रोजीच्या मध्यरात्रीपासून लागू झाला असून पाणी आवर्तनाचा कालावधी संपेपर्यंत तो प्रभावी राहणार आहे. आदेशानुसार, या गावांमध्ये एका ठिकाणी पाच किंवा अधिक लोकांना गर्दी करता येणार नाही. मात्र, शासकीय अधिकारी, वाहनचालक व शासनाने अधिकृतपणे नेमलेले कर्मचारी यांना यामधून वगळण्यात आले आहे. तसेच, गोंदवले खुर्द, मणकर्णवाडी, पळशी या गावांमध्ये होणार्या धार्मिक, विवाह व अंत्यसंस्कार संबंधित कार्यक्रमांवर याचा परिणाम होणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर संहितेनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय दंडाधिकारी उज्वला गाडेकर यांनी स्पष्ट केले आहे.
या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी दहिवडी व म्हसवड पोलिस ठाण्यांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित भागांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची उपस्थिती सुनिश्चित करण्यात येणार आहे.