सातारा : महाराष्ट्राच्या जनमानसात कृष्णा नदीला सांस्कृतिक महत्त्व आहे, पण सध्या हीच कृष्णा नदी जलपर्णीच्या जाळ्यामध्ये सापडली आहे. या जाळ्यातून कृष्णा नदीला सोडवण्याचे अनेक प्रयत्न झाले आणि चालू आहेत. हीच जलपर्णी नदीच्या पर्यावरणाला धोकादायक असली तरी तिचा नायनाट करत असताना तिचा उपयोगही केला जात आहे. या जलपर्णीपासून जनावरांसाठी चारा आणि गृहोपयोगी वस्तू बनवल्या जात आहेत. ऐतिहासिक वाईमधील धोम परिसरात हा उद्योग सुरु झाला आहे. नकोशा जलपर्णिला शोभेच्या वस्तूंचा साज मिळत आहे.
रेड क्रेस्ट चॅरिटेबल ट्रस्ट आणि द हॅबिटॅट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा नदीवर धोम येथे नदी स्वच्छता तसेच विलुप्त होण्याच्या मार्गावर असणार्या मत्स्य प्रजातींचे पुनर्वसन करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रा. नीरज हातेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि द हॅबिटॅट ट्रस्ट यांच्या आर्थिक मदतीने रेड क्रेस्ट चॅरिटेबल ट्रस्ट वाई मधील धोम येथे जलपर्णी काढण्याची मोहीम राबवत आहे.
प्रा. नीरज हातेकर यांच्या कल्पनेनुसार जलपर्णी काढणे आणि स्थानिक कातकर्यांची उपजीविका या दोन्ही गोष्टींची जर सांगड घालता आली तर वारंवार जलपर्णी काढली जाईल. काही प्रमाणात जलपर्णी जरी शिल्लक राहिली तरी ती पर्यावरणाकरता तेवढी घातक नसेल. निघालेल्या जलपर्णीपासून विविध वस्तू बनवणे, त्याचा वापर गुरांच्या चार्यासाठी करणे बायोगॅससाठी करणे इत्यादी गोष्टींमधून जलपर्णी निघणे आणि त्याची विल्हेवाट लागणे हे चक्र चालू राहील आणि नदीला मोकळा श्वास घेता येईल. याचबरोबर प्रकृती सुधारलेल्या नदीमध्ये स्थानिक माशांच्या प्रजातींची पुनर्स्थापना करणे असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. गेले काही महिने हा उपक्रम चालू आहे. या उपक्रमामध्ये डॉ. नीरज हातेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेड क्रेस्ट चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सलमान शेख, यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा येथील फिशरीज विभागाच्या प्राध्यापिका डॉ. नेहा पाटील कार्यरत आहेत.
ओल्या जलपर्णीचा उपयोग जनावरांच्या चार्यामध्ये करण्याचा रेड क्रेस्ट चॅरिटेबल ट्रस्टचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी जलपर्णीचे फूड लॅबमधून रिपोर्ट काढून आणण्यात आले आहेत. त्या रिपोर्टनुसार जलपर्णीचा मुरघास बनवता येऊ शकतो.
स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती
नदी-परिसंस्था सुधारेल
पाण्याची गुणवत्ता सुधारेल
माशांच्या स्थानिक प्रजाती जोपासल्या जातील.