सातारा : एप्रिल महिन्यात सूर्यदेव आग ओकत असल्याने जिल्ह्यातील धरणे, तलाव, बंधार्यांतील जलसाठा कमी झाला आहे. नदी नाले कोरडे ठाक झाले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असून, पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सातारा जिल्ह्यातील 49 गावे व 298 वाड्यांवरील 71 हजार 503 नागरिक व 43 हजार 657 जनावरे तहानली आहेत. त्यांना 56 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
सातारा जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच तीव्र उन्हाळा सुरू झाला आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढू लागला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावत चालली आहे. गावोगावी पाणी टंचाईबरोबर चार्याचीही टंचाई जाणवू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
माण तालुक्यातील बिजवडी, पांगरी, येळेवाडी, पाचवड, राजवडी, जाधववाडी, वडगाव, मोगराळे, मोही, डंगिरेवाडी, थदाळे, वावरहिरे, अनभुलेवाडी, दानवलेवाडी, हस्तनपूर, सोकासन, धुळदेव, वरकुटे म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी, भाटकी, संभुखेड, खडकी, रांजणी, जाशी, पळशी, मार्डी, खुटबाव, पर्यंती, इंजबाव, भालवडी, पानवण, विरळी, वारुगड, कुळकजाई, टाकेवाडी, उकिर्डे, कोळेवाडी, परकंदी, शिंदी बु., महिमानगड, दोरगेवाडी अशी 42 गावे व 291 वाड्यांवरील 65 हजार 152 नागरिक व 40 हजार 151 जनावरांना 45 टँकरने पाणीपुरवठा होत आहे.
पाटण तालुक्यातील जाधववाडी, जंगलवाडी, शिद्रुकवाडी वरची खळे, शिद्रुकवाडी काढणे, भोसगाव, चव्हाणवाडी नाणेगाव अशा एका गावास व 4 वाड्यांवरील 1 हजार 586 नागरिक व 987 जनावरांना 3 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. वाई तालुक्यातील मांढरदेव गावठाण, गुंडेवाडी, बालेघर अंतर्गत कासुर्डेवाडी, अनपटवाडी अशा 2 गावे व 3 वाड्यांवरील 2 हजार 938 नागरिक व 934 जनावरांना 4 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
कोरेगाव तालुक्यातील भंडारमाची व बिचुकले या दोन गावातील 1 हजार 827 नागरिक व 1 हजार 585 जनावरांना 2 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यातील मांजरवाडी, नवलेवाडी या गावांना दोन टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर माण तालुक्यात 11 विहिरी व 6 बोअर, वाई व कोरेगावमध्ये प्रत्येकी 1 विहीर, कराडमध्ये 2 विहिरी, खंडाळामध्ये 1 विहीर व 1 बोअर तसेच खटावमध्ये 2 बोअर अशा मिळून 16 विहिरी व 9 बोअर अधिग्रहीत केले आहेत.