कराड : जे गाव उन्हाळ्यात पाण्यासाठी टँकरवर अवलंबून होते, जनावरांच्या चारा-पाण्याच्या समस्येला तोंड देत होते, तेच खोडजाईवाडी गाव लोकसहभागातून जलसमृध्द झाले आहे. ही किमया साधली आहे नाम फाउंडेशनने केलेली मदत, टाटा मोटर्सने दिलेला सीएसआर फंड आणि कराड पंचायत समितीचे मार्गदर्शन यामुळे. खोडजाईवाडी ग्रामस्थांनी एकजुटीतून जलक्रांती घडवून आणली आहे. गाव करी ते राव काय करी, या म्हणीचा प्रत्यय खोडजाईवाडीत गेल्यावर येतो.
कराड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर, मसूर व किवळ गावच्या पूर्वेस खोडजाईवाडी वसले आहे. शंभर उंबरठ्याचे जेमतेम 600 लोकसंख्येचे हे गाव. डोंगररांगांचे नैसर्गिक संरक्षक कवच लाभलेलं हे गाव, तरी त्याची खरी ओळख होती दुष्काळग्रस्त गाव म्हणूनच.गावात पाण्याची तीव्र टंचाई. उन्हाळा सुरू झाला की गावात टँकरच्या फेर्या सुरू, पाण्यासाठी लागणार्या लांबच लांब रांगा. पाण्यासाठी रानोमाळ महिलांची भटकंती. शेतीच्या पाण्याचे दुर्भिक्ष अशी विदारक परिस्थिती पहायला मिळत होती.
परंतु हळू हळू हे चित्र पालटलं. आपलं गाव आपणच जलसमृध्द करायचे या इर्षेने गाव पेटून उठलं. गावकर्यांच्या एकजुटीने गावात श्रमदान सुरू झाले. पाणी आडवा, पाणी जिरवा हे प्रत्यक्ष कृतीत उतरत पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब साठवायला आणि जमितीत मुरवायला सुरूवात झाली. या परिवर्तनाच्या शाश्वत विकासात नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्स या सामाजिक संस्था मदतीला आल्या. कराड पंचायत समितीचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.
खोडजाईवाडी तलावाचे खोलीकरण करण्यात आले. श्रमदानातून तब्बल 1350 हजार घनमीटर पाणी साठवण क्षमतेचा भव्य तलाव आकारास आला. गावात, शिवारात ठिकठिकाणी शोषखड्डे काढून पावसाचे पाणी जमिनीत मुरवले गेले.ओढ्यावर बंधारे बांधण्यात आले. परिणामी विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली. शेतात, वाडी, वस्तीवर पाणी खळखळू लागले. ग्रामस्थांच्या कष्टाचे चीज झाले. सरपंच राजू मांडवे, माजी उपसरपंच सागर गोडसे, ग्रामविकास अधिकारी ज्योती जाधव, सुधीर कदम तसेच ग्रामस्थांनी एकजुटीतून शाश्वत विकासाची किमया करून दाखवली.
गावची स्मार्ट व्हिलेज म्हणून ओळख निर्माण होत आहे. गावातील अंतर्गत रस्ते पक्के सिमेंटच्या झाले आहेत. ग्रामपंचायतीसाठी सुसज्ज कार्यालय उभारले गेले. शासनाच्या सीएसआर फंडाच्या मदतीने गावात 40 सौर दिवे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे विजेची बचत झाली. शिवाय अखंंडीत वीज मिळाली. खोडजाईवाडीने शाश्वत विकासाच्या नऊ संकल्पनांवर खर्या अर्थाने काम केले आहे. हे गाव एक आदर्श गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवत आहे.
खोडजाईवाडी दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले जात होते. दोन वर्षांपासून गावात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. शंभर टक्के शोषखड्डे, सोलर दिवे बसविले गेले, शाळा डिजिटल झाली. या शिवाय आठवड्यातून एक दिवस श्रमदानातून गाव स्वच्छ केले जात आहे. आदर्श गाव म्हणून या गावाची ओळख बनली आहे. इतर गावांनी खोडजाईवाडीचा आदर्श घ्यावा.- प्रताप पाटील गटविकास अधिकारी पं.स.कराड