Satara News | मातृभूमीसाठी वाईतील जवानांचीही शर्थ File Photo
सातारा

Satara News | मातृभूमीसाठी वाईतील जवानांचीही शर्थ

भारत -पाकिस्तान युध्द, दहशतवादी चकमक व विविध ऑपरेशन्समध्ये सहभाग

पुढारी वृत्तसेवा

वाई : सातारा हा शूरवीरांचा जिल्हा असून येथून मोठया संख्येने जवान सैन्यात भरती झाले आहे. याला वाई तालुकाही अपवाद ठरलेला नाही. गेल्या दोन ते तीन दशकात वाई तालुक्यातील अनेक जवान मातूभूमीसाठी कामाला आहे. भारत पाकिस्तान युध्द, दहशतवादी चकमकी व विविध ऑपरेशन्समध्ये वाईतील जवान शहीद झाले आहेत.

भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यामुळे या शहिदांना न्याय मिळाल्याची भावना कुटुंबियांकडून व्यक्त केली जात आहे. ऑपरेशन सिंदूरने सैन्यदलात भरती असलेल्या जवानांच्या कुटुबियांचा उर अभिमानाने भरून आला आहे.

2009 साली गडचिरोतील नक्षलग्रस्त भागात गस्त घालत असताना धोम ता. वाई येथील चंद्रशेखर संजय देशमुख अवघ्या पंचवीस वर्षाचा जवान शहीद झाला. यावेळी त्यांना एकावेळी 200 नक्षलवाद्यांचा सामना करावा लागला. यात 18 जवानांना वीरमरण आले. सैन्यात त्यांनी 2 वर्षे सहा महिने सेवा बजावली.

आसरे गावातील शहीद गणेश किसन ढवळे हे जम्मू काश्मीर मध्ये 30 जानेवारी 2017 रोजी दहशतवाद्यांच्या चकमकीत शहीद झाले. ते 56 आर आर मच्छल सेक्टर जम्मू काश्मीर येथे कार्यरत होते. बारा मराठा बटालियन युनिट रँक शिपाई म्हणून ते आर्मीत भरती झाले. बर्फाळ प्रदेशात गस्त घालताना दहशत वाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांना वीर मरण आले. गणेश ढवळे यांचे 2015 मध्ये लग्न झाले त्यानंतर लगेचच जानेवारी 2017 मध्ये वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांना वीरमरण आले.

अभेपुरी ता. वाई येथील निलेश अशोक मांढरे हे दहशतवाद्यांशी मुकाबला करत असताना त्यांच्या डोक्याला गोळी लागून ते शहीद झाले. ते 2003 साली देशसेवेसाठी सैन्यात भरती झाले. 2007 मध्ये उधमपूर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गोळी लागली. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. अतिशय कमी वयात 21 व्या वर्षी त्यांना वीर मरण आले.

2015 मध्ये जम्मूतील कठुआतील राजबाग येथे दहशतवाद्यांनी रात्रीच्यावेळी केलेल्या हल्ल्यात वाईच्या सिद्धनाथवाडीतील सुरज सर्जेराव मोहिते यांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. याच चकमकीत त्यांना गोळी लागल्याने ते शहीद झाले. सूरज हे अवघ्या 19 व्या वर्षी शहीद झाले. त्यांना केवळ एक वर्षच देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यांची पहिलीच पोस्टिंग कठुआ येथे झाली. 12 मार्च 2015 सूरज हे देशसेवेसाठी ड्युटीवर हजर झाले आणि 20 मार्च 2015 रोजी ते शहीद झाले. सुरज मोहितेने यांनी रात्रीच्या वेळी आपल्या साथीदार जवानांचा जीव वाचवत हल्ला करणार्‍या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालूनच शहीद झाले. सूरज हे मूळचे जावली तालुक्यातील गणेशवाडी (सरताळे) येथील असून सध्या संपूर्ण कुटुंब वाईतील सिद्धनाथवाडीत वास्तव्यास आहे.

याचबरोबर 1965 च्या युध्दात बावधनचे मारूती कदम, शिरगावचे गणपत कांबळे, विरमाडे येथील बाबूर कुंभार, कवठे, ता. वाई येथील हिंदूराव डेरे शहीद झाले. 1971 च्या पाकिस्तानविरूध्दच्या युध्दात गुळुंचे सदाशिव भिलारे, भुईंजचे हिंदूराव भोसले, बेलमाची येथील बबन निंबाळकर, जांब येथील सर्जेराव बाबर हे शहीद झाले. ऑपरेशन विजयमध्ये कळंबे येथील शशिकांत शिवथरे हे शहीद झाले. तसेच 2017 मध्ये राबवण्यात आलेल्या ऑपरेशन रक्षकमध्ये आसरे येथील गणेश ढवळे, तर 2021 मध्ये राबवण्यात आलेल्या ऑपरेशन लेपर्डमध्ये ओझर्डेतील सोमनाथ तांगडे व आसले येथील सोमनाथ मांढरे, निकमवाडी येथील मानसिंग निकम, आसरे येथील गणेश ढवळे, उडतारे येथील अशोक बाबर यांना वीरगती प्राप्त झाली. दरम्यान, मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कवठे येथील अंबादास पवार यांनाही दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT