Online Gaming Addiction | वाईतील तरुण ऑनलाईन गेमच्या विळख्यात  File Photo
सातारा

Online Gaming Addiction | वाईतील तरुण ऑनलाईन गेमच्या विळख्यात

लाखो रुपये उधळले; काही जणांकडून आत्महत्येचाही प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

वाई : सुसंस्कृत आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या वाईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. शहरातील तरुण पिढी ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या विळख्यात अडकून बरबाद होत असून, लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या खेळात पैसे गमावल्याच्या नैराश्यातून काही तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वाई शहर आणि परिसरात ऑनलाईन गेमिंगचे व्यसन वेगाने पसरत आहे. कॉलेजचे तरुण-तरुणी, विशेषतः ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी, शहरातील झगमगाटाला भुलून या व्यसनाच्या आहारी जात आहेत. पान टपर्‍या आणि कॅफेमध्ये सहज उपलब्ध असलेल्या या ऑनलाईन जुगारावर तरुण लाखो रुपये उधळत आहेत. पैसे गमावल्याने अनेकजण कर्जबाजारी होत असून, व्यसनाधीनतेच्या मार्गाला लागले आहेत.

एकीकडे ऑनलाईन जुगाराने थैमान घातले असताना, दुसरीकडे शहरात पारंपरिक जुगाराचे अड्डेही राजरोसपणे सुरू आहेत. वाई पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर हे अड्डे चालत असले, तरी पोलीस त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. पोलिस केवळ शहराबाहेरील अड्ड्यांवर कारवाई करून आपली पाठ थोपटून घेत आहेत. या गंभीर प्रकाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास तरुण पिढीचे भविष्य अंधारात जाईल, अशी भीती व्यक्त होत असून, पोलिसांनी यावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

ऑनलाईन गेम्समध्ये उडवले दीड कोटी

याचाच एक धक्कादायक प्रकार तालुक्यातील एका गावात घडला. एका युवकाने ऑनलाईन गेममध्ये पैसे गमावल्याच्या नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न केला. या युवकाने ऑनलाईन गेमवर तब्बल दीड कोटी रूपये उडवले आहेत. यातूनच त्याच्यावर लाखोंचे कर्ज झाल्याने त्याने हे पाऊल उचलले. तो आजही मृत्यूशी झुंज देत आहे. त्यामुळे तरूण पिढीने ऑनलाईन गेम्सच्या फंदात पडू नये, असे आवाहन केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT