वाई : वाई तालुक्यासह पश्चिम भागातील रस्त्यांवरील ओढे-नाल्यांवरील पुलांवर संरक्षक कठडे नसल्यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार अपघात होऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. या भागातील अनेक पुलांवर कोणतेही संरक्षक कठडे नसल्याने वाहन थेट ओढ्यात कोसळण्याचा धोका कायम आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. तरीदेखील प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे.
एखादा मोठा जीवितहानीचा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल केला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यावर ठराव पाठवले आहेत, मात्र मंजुरी मिळालेली नाही, असे उत्तर दिले जात आहे. गेली दोन-तीन वर्षे हीच कारणे देत वेळकाढूपणा केल्याने विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पश्चिम भाग हा ऐतिहासिक वारसा लाभलेला असून येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक, गिर्यारोहक आणि दुर्गप्रेमी येत असतात. अशा परिस्थितीत मूलभूत सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका स्थानिकांसह पर्यटकांनाही बसत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ कागदोपत्री ठराव पाठवण्यापुरते मर्यादित राहिला आहे. प्रत्यक्ष कामात टाळाटाळ केली जात असल्याने लोकांचा जीव टांगणीला लागला आहे. काही ठिकाणी कंत्राटदारांना अभय देऊन कामे रखडवली जात आहेत. या प्रकराची वरिष्ठांनी दखल घेवून संबंधितांवर कारवाई करावी. तसेच पुलांवर त्वरित बॅरिकेट बसवण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.