Wai traffic issue Pudhari
सातारा

Wai traffic issue: वाहतूक कोंडी; वाईकरांच्या रोजच बोकांडी

प्रवासी, वाहनचालक त्रस्त; अपघात वाढले : पोलिसांकडून उपाययोजनांना ठेंगा

पुढारी वृत्तसेवा

वाई : ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असलेले वाई शहर सध्या भीषण वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जात असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांवर कुठेही बेधडक वाहन पार्किंग केल्यामुळे वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला आहे.

रस्त्यांच्या कडेला अव्यवस्थित पार्किंग, अरुंद रस्ते आणि वाढती वाहनसंख्या यामुळे वारंवार ट्रॅफिक जॅम होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेत ट्रॅफिकमध्ये अडकून राहणे दुचाकीस्वारांसाठी अत्यंत त्रासदायक ठरत आहे. वाहतूक नियंत्रणासाठी नियुक्त होमगार्ड अनेकदा कर्तव्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. काही ठिकाणी ते मोबाईलमध्ये गुंतलेले किंवा गप्पांमध्ये रमलेले दिसतात, तर ट्रॅफिक जॅमकडे दुर्लक्ष होत असल्याचेही चित्र आहे.

वाई पोलीस ठाण्याकडे मर्यादित मनुष्यबळ असल्यामुळे केवळ तीन ट्रॅफिक पोलिसांवर संपूर्ण शहराची जबाबदारी आहे. त्यामुळे वाढत्या कामाच्या ताणामुळे प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे. परिणामी, वाहतूक नियमांचा धाक कमी झाला असून नागरिकांकडून मनमानी प्रकार वाढले आहेत.

महागणपती मंदिर परिसरात परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. रस्त्याच्या मध्यभागीच वाहन थांबवून पार्किंगसाठी आत घेतली जात असल्यामुळे मंदिराच्या पार्किंगमध्ये प्रवेशासाठी लांबच लांब रांगा लागतात आणि वाहतूक ठप्प होते. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. तसेच, शहराच्या मध्यवर्ती भागात मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडून कोणत्याही वेळेचे बंधन न पाळता माल चढ-उतार केला जातो. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. या वाहनांसाठी निश्चित वेळ ठरवण्यात आल्यास परिस्थितीत सुधारणा होऊ शकते, अशी मागणी नागरिक करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT