भुईंज : वेळे, ता. वाई येथील सोळशी फाटा परिसरात गुरुवारी डंपरच्या धडकेत 70 वर्षीय वृद्धा ठार झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताची भुईंज पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
जमुना बाळकृष्ण ढमाळ (वय 70, रा. वेळे, ता. वाई) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धेचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जमुना ढमाळ या सकाळी 11 वाजता त्यांच्या शेतात गेल्या होत्या. सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी परत येत होत्या. सोळशी फाट्यावर महामार्ग ओलांडताना, सातारा दिशेने वळत असलेल्या डंपर (क्र. एम.एच. 11 डी डी 3191) चा त्यांना धक्का लागला. त्याखाली पडल्यावर डंपरच्या क्लिनर बाजूच्या मागील चाकाने त्यांचा अंगावर दबाव पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
जमुना यांना तत्काळ सूरज पवार, संतोष सोनवणे यांच्या मदतीने गजानन ढमाळ यांनी कवठे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल केले. परंतु वैद्यकीय सूत्रांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी किरण जयसिंग नायकवडी (रा. बावधन, ता. वाई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अनिल गजानन ढमाळ (रा.वेळे) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास हवालदार आप्पा कोलवडकर करत आहेत.