वाई : सातारा जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी परिस्थिती वाई येथील ग्रामीण रुग्णालयात पहायला मिळत आहे. तालुकास्तरीय ओपीडी असलेल्या या रुग्णालयात अनेक दिवसांपासून डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. याचबरोबर सुविधांची वानवा असल्याने रूग्णालयचं व्हेंटीलेटरवर असल्याची परिस्थिती आहे.
दररोज सुमारे 400 ते 500 रुग्ण उपचारासाठी येत असतानाही डॉक्टरांचा तुटवडा असल्याने अनेकांना योग्य उपचार मिळत नाहीत. परिणामी रुग्णांना सातारा येथे हलवावे लागत आहे. जर येथेच उपचार मिळणार नसतील, तर या रुग्णालयाचा उपयोग काय? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. गोरगरीबांसाठी आधार असलेल्या या रुग्णालयात अपुऱ्या सुविधा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्यात चार मंत्री व दोन खासदार असतानाही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. डॉक्टरांच्या नियुक्तीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असून त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे वाई ग्रामीण रुग्णालयात तातडीने डॉक्टरांची नियुक्ती करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.