वाई : वाई बाजार समिती परिसरात प्रतिबंधक उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येते आहे. बाजार समितीत गटारांची गैरसोय, उघड्यावर पडलेला कचरा, आणि सडलेला भाजीपाला यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांची उत्पत्ती झपाट्याने वाढली आहे. कचरा टाकण्यासाठी ट्रॉलीची व्यवस्था असली तरी कचरा ट्रॉलीमध्ये टाकला जात नसून, तो ट्रॉलीच्या खाली साचत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. दुर्गंधीमुळे आडतदार व हमालाच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासाठी उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.
वाई बाजार समितीमध्ये तालुक्यासह खंडाळा व महाबळेश्वरमधील काही गावांमधून शेतकरी आपला शेतमाल घेऊन बाजार समितीत येत असतात. त्यामुळे बाजार समितीत वर्दळ असते. मात्र, बाजार समिती आवारात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या रोगांचा फैलाव होण्याची शक्यता आहे. स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असतानाच उघडी गटारे व कचराही तसाच टाकला जात असल्याने परिसर दिवसेंदिवस बकाल होऊ लागला आहे.
साथीच्या रोगांपासून संरक्षण मिळवण्यासाठी फवारणी किंवा बीएससी पावडरचा उपयोग केला जात नाही. यामुळे शेतकरी, व्यापारी व ग्राहक यांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण होणार आहे. बाजार समितीला सेसच्या माध्यामातून मोठया प्रमाणात महसूल मिळत असतो. वाई बाजार समितीत हळदीचे मोठया प्रमाणात लिलाव होत असतात. त्याचबरोबर इतर पिकांचीही मोठी आवक असते. अशा परिस्थितीत बाजार समिती आवार स्वच्छ असणे आवश्यक आहे. परंतु, याकडे बाजार समितीचे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. प्रशासनावर सभापती व संचालकांचा कोणतेच नियंत्रण नसल्याने बाजार समितीची ही दुरवस्था झाली आहे. विशेषत: आडतदार व शेतकर्यांना प्रत्यक्ष परिसरात लिलावासाठी थांबावे लागते. परंतु, दुर्गंधीमुळे थोडा थांबणेही कठीण होते. यासाठी स्वच्छतेच्या अनुषंगाने उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.
दिवसभर बाजार समितीचा कारभार चालू असतो. त्यामुळे शेतकरी कधीही माल घेऊन येतो त्यामुळे बाजार समितीत शेतमाल खरेदी-विक्रीसाठी निश्चित वेळ नसल्यामुळे शेतकर्यांना माल खूप कमी दरात विकावा लागतो, हे वास्तव आहे. शेतकर्यांच्या मालाला भाव मिळत नाही. यासाठी संचालकांनी लिलाव ठराविक वेळेत करणे गरजेचे आहे. काही व्यापार्यांची मोनोपॉली मोडीत काढून शेतकर्यांना न्याय देणे आवश्यक आहे.