वाई-मांढरदेव मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य 
सातारा

Satara News : वाई-मांढरदेव मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य

भाविक-पर्यटकांचे दुर्गंधीने स्वागत; स्वच्छता करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

वाई : पर्यटननगरी आणि तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या वाई शहराची प्रतिमा वाई-मांढरदेव मुख्य रस्त्यावरील कचऱ्यामुळे मलिन होत आहे. नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे या मार्गावर उघड्यावर कचऱ्याचे ढीग साचले असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

श्री काळूबाई देवीच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक या मार्गाचा वापर करतात. तसेच महाबळेश्‍वर व पाचगणीकडे जाणाऱ्या पर्यटकांचीही या रस्त्यावर वर्दळ असते. मात्र, रस्त्यालगत प्लास्टिक, ओला-सुका कचरा आणि कुजलेल्या कचऱ्याचे ढीग साचल्याने शहराच्या प्रतिमेला धक्का बसत आहे. पावसामुळे दुर्गंधी वाढली असून, वाऱ्यामुळे कचरा रस्त्यावर विखुरला जात आहे.

कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे मोकाट कुत्रे, डुकरे व इतर जनावरे परिसरात वावरत असल्याने वाहतुकीसही धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात अशा परिस्थितीत डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीचे आजार पसरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

मुख्य रस्त्यावर दिवसेंदिवस वाढणारे कचऱ्याचे ढीग असूनही पालिका प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना होत नाही. स्वच्छतेसाठी निधी खर्च होत असताना शहराची अशी अवस्था का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT