सातारा : वाई येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेमध्ये नंदकुमार खामकर आणि त्यांचे सहकारी वजीर शेख (मयत) यांनी तब्बल 174 बोगस कर्जदार उभे करुन त्यांच्या नावावर कोट्यवधींची बोगस कर्ज प्रकरणे करुन आर्थिक घोटाळा केल्याचा ठपका आहे. या बँकेमध्ये तब्बल 42 कोटी रुपयांचा अपहार समोर आला. वाई शहरामध्ये माजी नगरसेवक असलेल्या नंदकुमार खामकर यांच्यावरील विश्वासामुळे ठेवीदारांनी आपले लाखो रुपये हरिहरेश्वर बँकेत गुंतवले होते. मात्र, बँकेतील घोटाळा समोर आल्यानंतर गुंतवणुकदारांच्या जीवाला घोर लागला. ठेवीदारांनी अनेक वर्षे लढा दिल्यानंतर प्रशासनाने यात लक्ष घातले. अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्यावतीने या बँकेतील घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात आला.
या प्रकरणात अजित गुलाबराव खामकर, जगन्नाथ बाजीराव सावंत, नंदकुमार ज्ञानेश्वर खामकर, वजीर कासमभाई शेख, मनोज श्रीधर खटावकर, प्रकाश केरबा ओतारी, विलास गणपती खामकर, चंद्रकांत धर्माजी शिंदे, विष्णुपंत शंकर खरे, अर्जुन दिगंबर खामकर, जनार्दन आनंदा वैराट, किरण भास्कर कदम, जयश्री विजय खामकर, गोविंद तुकाराम लंगडे, अरुण महादेव केळकर, संतोष शिवाजी चोरगे, रमेश दगडू जाधव, विनोद मनोहर शिंदे, रणजीत खाशाबा शिर्के, सुनील चंद्रकांत वंजारी, वसंत आनंदा सणस, सुचित महादेव जाधव, महेश प्रताप शिंदे, दीपक धर्माजी शिर्के, तानाजी मानसिंग भोसले, राहुल धोंगडे, डी. बी. खरात, एम. एस. कदम यांच्यावर दोषारोपत्र दाखल करण्यात आले.
या प्रकरणाचा जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग 1 विजय सावंत यांनी लेखापरीक्षण अहवाल तयार करुन गुन्हा दाखल केला. हरिहरेश्वर बँकेचे चाचणी लेखापरीक्षण जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी 22 जानेवारी 2020 रोजी करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार 13 ऑगस्ट 2021 रोजी हे लेखापरीक्षण पूर्ण करण्यात आले, त्यामध्ये अफरातफरी व गैरविनियोग अपराधाचा अहवाल सावंत यांनी सादर केला होता. त्यानुसार नंदकुमार ज्ञानेश्वर खामकर व वजीर कासमभाई शेख (मयत) यांनी त्यांचे मित्र, संचालक, व्यावसायिक, कामगार, भागीदार व इतर यांच्या नावे बोगस कर्जे उचलली.
नंदकुमार खामकर यांनी हरिहरेश्वर डेव्हलपर्स वाई या फर्मच्या नावे सोनगीरवाडी वाई येथील तीन मिळकतींवर 62 कर्जदारांच्या नावे बनावट कागदपत्र व दस्तऐवज तयार करून गहाण खत व कर्ज प्रकरणे दाखवून तसेच बांधकाम केलेल्या सदनिका कर्जदारांना दिल्याचे दर्शवून बँकेतून संबंधिताच्या नावे कर्ज घेतले. तसेच वजीर कासमबाई शेख यांनी वाई येथील मिळकतीवर एशियन डेव्हलपर्स या फर्मच्या मध्ये 50 कर्जदारांच्या नावे बनावट कागदपत्रे व दस्तऐवज तयार करुन घाणखत व कर्ज प्रकरणे दाखवून तसेच बांधकाम केलेल्या सदनिका कर्जदारांना दिल्याचे दर्शवून बँकेतून संबंधितांच्या नावे कर्ज घेऊन बँक फसवणूक केली. संबंधित संचालकांनी पदाचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी ठेवीदारांचा विश्वासघात केला.
लेखापरीक्षणाअंती सन 2011 पासून घोटाळ्याला सुरुवात झाल्याचे दिसून आले. एकूण 112 बनावट प्रकरणे तयार करुन बँकेच्या निधीचा गैरवापर केला. या कर्ज प्रकरणांना संचालकही जबाबदार असल्याने त्यांच्याही रुजवाती लेखापरीक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आल्या संबंधित कर्जदारांनी हे कर्ज मान्य केले. तसेच ही कर्ज प्रकरणी नंदकुमार खामकर, वजीर शेख यांच्या आर्थिक फायद्यासाठी घेतल्याचे रिझर्व्ह बँकेला कळवले. हरिहरेश्वर बँकेच्या सन 2015-16, 2016-17, 2017-17, 2018-19 या कालावधीमध्ये प्रत्यक्षात बनावट कर्ज खात्यावर रकमेचा भरणा न करता 112 बनावट कर्ज खात्यावर ती रक्कम वळवण्यात आली.
दरम्यान, लेखापरीक्षक विष्णू साळुंखे यांनी केलेल्या पुरवणी लेखापरीक्षणात आणखी 4 कोटी 49 लाख 52 हजार 430 रुपयांचा अपहारही आढळून आला. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ही रक्कम व्यवस्थापक जाधव, संचालक वजीर शेख व नंदकुमार खामकर यांच्या सांगण्यावरून रोखीने भरणा केल्याचे जबाबात म्हटले. मात्र या प्रकरणात कायदेशीर जबाबदारी तत्कालीन संबंधित शाखाप्रमुख यांची होती. चांगल्या संस्थांनाही हरिहरेश्वरमधील गैरव्यवहारामुळे अडचण निर्माण केली.
छोट्या जखमेचे झाले गँगरीन
97 व्या घटनादुरुस्तीने संबंधित सहकारी संस्थांना त्यांचे लेखापरिक्षण खासगी व्यक्तींकडून करुन घेण्याचे अधिकार प्राप्त झाले. याचाच गैरफायदा संचालक मंडळाने घेतला. हरिहरेश्वर बँकेचे वेळोवेळी खासगी लेखापरीक्षण झाले होते. मात्र, संबंधित वैधानिक लेखापरीक्षकांनी बँकेतील आर्थिक गैरव्यवहारावर पांघरुन टाकत त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे छोट्या जखमेचे गँगरीन झाले.