सातारा : सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार दि. 2 रोजी 156 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदान होणार आहे. या निवडणुकीत 1 लाख 48 हजार नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी 172 पथके असून त्यामध्ये सुमारे 688 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दरम्यान, मतदानानंतर लगेच बुधवारी सकाळी 10 पासून मतमोजणी एमआयडीसीतील डीएमओ गोडावूनमधील मतमोजणी केंद्रात सुरू होणार आहे. 10 टेबलावर मतमोजणीच्या 16 फेर्या होणार आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत निकालाचा स्पष्ट कल दिसून येणार आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सातारा प्रांताधिकारी आशिष बारकूल यांच्या सुचनेनुसार निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान तसेच मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आढावा घेतला. सातारा शहरातील 156 मतदान केंद्रांवर 2 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने व्यापक तयारी केली असून मतदारांना सुरक्षित, व्यवस्थित, सुलभ आणि भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे, यासाठी उपाययोजना केल्या आहेत. मतदानानंतर उद्या दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजाणी सुरू होणार आहे. मतमोजणीच्या 16 फेर्या होणार असून दुपारी 12 वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
सातारा प्रांताधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बारकूल यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी समीर यादव तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विनोद जळक यांनी मतदान व मतमोजणी प्रक्रियेची जोरदार तयारी केली आहे. सातारा शहरातील सर्व 156 मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी मतदान अधिकारी व कर्मचार्यांना एमआयडीसीतील डीएमओ गोडावूनमधील मतमोजणी केंद्रावरून साहित्यवाटप करण्यात आले. मतदान प्रक्रियेयासाठी 172 पथके असून त्यामध्ये सुमारे 688 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. इतर कामकाजासाठी 150 कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाने स्वीप मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. सातार्यातील सर्व 25 प्रभागांत फ्लेक्स आणि होर्डिंग्ज लावून मतदारांना प्रोत्साहित करण्यात आले. या निवडणुकीत 1 लाख 48 हजार 307 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान संपल्यानंतर सर्व मतदान यंत्रे एमआयडीसीतील डीएमओ गोडावूनमधील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येणार आहेत. स्ट्राँग रूममध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले असून पोलिसांचा कडक पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये, यासाठी अतिरिक्त सुरक्षा पथके तैनात राहणार आहेत.
मतदानानंतर दुसर्याच दिवशी दि. 3 डिसेंबरला सकाळी 8 वाजता स्ट्राँग रूम उघडण्यात येणार असून मतमोजणीची तयारी सुरू होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. 16 फेर्यांमध्ये मोजणी होणार असून दुपारी 12 वाजेपर्यंत प्राथमिक निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पोस्टल मतपत्रिकांची मोजणी 3 टेबलवर तर ईव्हीएमची मतमोजणी 10 टेबलवर केली जाणार आहे. प्रत्येक टेबलसाठी 4 अधिकारी व कर्मचारी नियुक्त आहेत. मतमोजणीला उपस्थित राहणार्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना पूर्वनोंदणीद्वारे पासेस देण्यात येणार आहेत. मतमोजणीदरम्यान पारदर्शकता, शिस्त राखण्यासाठी सर्व नियम काटेकोरेपणे पाळले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
* एकूण मतदार : 1 लाख 48 हजार 307
* एकूण मतदान केंद्रे : 156
* मतदान यंत्रे : सीयू 156 व बीयू 300
* दिव्यांगांसाठी 15 विशेष रिक्षा
* मतमोजणीच्या 16 फेर्या
* मतमोजणी 3 रोजी सकाळी 10 वाजता