Vithabai Narayangaonkar, Mangala Bansode 
सातारा

Vithabai Narayangaonkar : पोटासाठी... वेदनांवर मात करत नाचल्या पोटुशा मायलेकी!

शिंगणापूर ते कवठेमहांकाळ... दोन पिढ्या, दोन प्रसंग; पण त्यागाचा धागा एकच!

पुढारी वृत्तसेवा

सतीश मोरे

कराड : रंगमंचावर टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. हजारो प्रेक्षकांचा जल्लोष उसळला होता; पण पडद्यामागे एक आई प्रसूतीच्या असह्य वेदना सहन करत होती. काही क्षणांतच तिने बाळाला जन्म दिला... आणि थोड्याच वेळात पुन्हा चेहऱ्यावर हसू आणत रंगमंचावर उभी राहिली. आई आणि मुलगी... दोन वेगळे काळ... दोन वेगळी ठिकाणं... पण वेदना एकच आणि कर्तव्यही एकच. एका आईने प्रसूतीनंतर काही क्षणांतच रंगमंच गाठला, तर दुसऱ्या आईने प्रसूतीच्या असह्य वेदना सहन करत अखेरच्या पडद्यापर्यंत भूमिका जिवंत ठेवली.

ही कथा आहे तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची. सन १९६४ मध्ये शिंगणापूरच्या यात्रेत त्यांचा तमाशा रंगला होता. नऊ महिने पूर्ण झालेले गर्भारपण... तरीही प्रेक्षकांचा हिरमोड होऊ नये, म्हणून त्या बोर्डावर नाचत राहिल्या. अखेर प्रसूतीच्या कळा असह्य झाल्यावर त्या राहुटीत गेल्या. साडीच्या पडद्याआड त्यांनी बाळाला कैलासला जन्म दिला. डॉक्टर नव्हते, दवाखाना नव्हता. दगडाने नाळ तोडली आणि काही वेळातच त्या पुन्हा रंगमंचावर आल्या. बाहेर प्रेक्षकांचा एकच गजर होता, विठा... विठा... पण त्या टाळ्यांमागे एका आईचा संघर्ष कुणालाच दिसला नाही. वर्षे लोटली, दशके लोटली... पण नियतीने जणू तोच प्रसंग पुन्हा उभा केला. यावेळी रंगमंच होता कवठेमहांकाळचा. कलाकार होत्या विठाबाईंच्याच कन्या मंगला बनसोडे करवडीकर. १० नोव्हेंबर १९७६ रोजी कवठेमहांकाळ येथे वगनाट्य रंगात आले होते. त्याचवेळी मंगलाताईंना प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. मात्र वेदना अंगावर घेत त्यांनी संपूर्ण प्रयोग पूर्ण केला. पहाटे चार वाजता तमाशा संपला. त्यानंतर त्यांना मिरजेच्या दवाखान्यात नेण्यात आले. तेथे त्यांनी पुत्र रत्नाला जन्म दिला. त्या बाळाचे नाव नितीन ठेवण्यात आले.

त्या प्रसंगाची आठवण सांगताना म्हणतात, आम्हा तमाशा कलावंतांचं आयुष्य असंच असतं. आम्ही स्टेजवरच जगलो... स्टेजवरच जगतो... आणि स्टेजवरच आमच्या वेदना लपवतो. आई आणि मुलगी... दोन वेगळे काळ... दोन वेगळी ठिकाणं... पण वेदना एकच आणि कर्तव्यही एकच. एका आईने प्रसूतीनंतर काही क्षणांतच रंगमंच गाठला, तर दुसऱ्या आईने प्रसूतीच्या असह्य वेदना सहन करत अखेरच्या पडद्यापर्यंत भूमिका जिवंत ठेवली. टाळ्या थांबू नयेत म्हणून त्यांनी स्वतःच्या वेदना थांबवल्या. आजच्या पिढीला हे अविश्वसनीय वाटेल. पण त्या काळातील कलावंतांसाठी कार्यक्रम थांबणे म्हणजे घराची चूल विझणे. पोटासाठी नाचले मी... हे गाणे त्यांनी केवळ गायले नाही, तर आपल्या आयुष्याने जगून दाखवले. टाळ्या प्रेक्षकांनी वाजवल्या; पण त्या टाळ्यांचा खरा आवाज या दोन मायलेकींच्या त्यागात आजही घुमत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT