सातारा : विडणी, ता. फलटण येथील उत्तरेश्वर हायस्कूल या परीक्षा केंद्रावर दहावीचे पेपर सहावीच्या विद्यार्थिनींकडून तपासून घेतल्याच्या तक्रारीने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळाने या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणली आहे. चौकशीमध्ये दहावीचे पेपर विद्यार्थिनींनी तपासले नसल्याचे स्पष्ट झाले असले, तरी उत्तरपत्रिकांसारख्या गोपनीय कागदपत्रांची हाताळणी विद्यार्थिनींकडून करून घेतल्याबद्दल संबंधित परीक्षकावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, सुमारे 125 उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्याचे आदेश दिले आहेत.
विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूलचे शिपाई मंगेश अभंग यांनी दूरध्वनीवरून आणि त्यानंतर 7 मार्च रोजी ई -मेलद्वारे बोर्डाकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीत मराठी विषयाचे परीक्षक वैभव शेंडे यांनी स्वतः पेपर न तपासता इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींकडून ते तपासून घेतले. हिंदी विषयाचे शिक्षक धनाजी नेरकर हे परीक्षा सुरू असताना अनधिकृतपणे केंद्रावर हजर राहून गैरप्रकार करत असल्याचे म्हटले होते. या तक्रारीवरुन कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते.
त्यानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे व विभागीय मंडळाच्या दोन सदस्यांच्या विशेष समितीने प्रत्यक्ष विडणी येथे जाऊन चौकशी करुन शाळेतील सीसीटीव्ही फुटेज, हजेरी पत्रके आणि संबंधित शिक्षकांचे जबाब नोंदवले. यामध्ये संबंधित विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष पेपर तपासले का? याचे उत्तर नाही असे आले आहे. परीक्षक वैभव शेंडे यांनी मराठीच्या उत्तरपत्रिका तपासत असताना, उत्तरपत्रिकेतील जी पाने कोरी होती, त्यावर लाल शाईने रेषा मारण्याचे काम दोन विद्यार्थिनींकडून करून घेतल्याचे समोर आले आहे. मात्र, हे काम स्वतः परीक्षकाने, पर्यवेक्षकाने किंवा नियामकाने करणे अपेक्षित असते. तसे न करता परीक्षक शेंडे यांनी हे काम विद्यार्थिनींना दिले होते. तसेच हिंदी विषयाच्या शिक्षकांबाबत करण्यात आलेल्या तक्रारीचीही चौकशी करण्यात आली. यामध्ये त्यांनी गैरप्रकार केला नसल्याचे आढळून आले आहे.
बोर्डाने परिक्षेतील पारदर्शकता जपण्यासाठी शेंडे यांच्याकडील 125 उत्तरपत्रिका नियमकांमार्फत ताब्यात घेवून त्या पुन्हा विभागीय मंडळ स्तरावर तज्ज्ञ परीक्षकांकडून तपासण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नियमाचे व गोपनीयतेचे उल्लंघन केल्याने मंडळाने वैभव शेंडे यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांचे उत्तरपत्रिका तपासणीचे संपूर्ण मानधन जप्त करण्यात आले आहे. परीक्षक शेंडे हे खाजगी अनुदानित शाळेचे कर्मचारी आहेत. त्यांना लागू असलेल्या महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी नियमावलीनुसार, संबंधित शैक्षणिक संस्थेला शेंडे यांच्यावर तात्काळ कठोर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.