तरडगाव : सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विषयी नितांत आदर होता. विदीप नेहमी म्हणायचे मी कायम अजित पवार यांच्यासोबत असतो. मी त्यांच्यावर शेवटपर्यंत राहणार आणि नियतीनेही त्यांचा हा शब्द खरा ठरवला. बुधवारी त्या दोघांचा शेवट देखील एकत्र झाला. शेवटच्या श्वासापर्यंत अजित पवार यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी पार पाडली असल्याची भावना जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.
बुधवारी सकाळी 9 वाजता अचानक बारामती येथे विमान अपघात झाल्याची बातमी तरडगाव येथे वाऱ्यासारखी पसरली. थोड्याच वेळात एक मोठी दुःखद बातमी समोर आली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू. पण गोष्ट तेवढ्यावरच थांबली नाही तर त्यांच्या सोबत त्यांचे सुरक्षा रक्षक असलेले तरडगाव येथील विदीप जाधव यांचा देखील मृत्यू झाला असल्याचे समजताच तरडगावावर दुःखाचा डोंगर कोसळला.
मुंबई पोलीस विशेष सुरक्षा अधिकारी हेड कॉन्स्टेबल विदीप दिलीप जाधव हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक म्हणून गेली 6 वर्ष काम करत होते. विदीप जाधव हे 2009 साली मुंबई पोलीस दलात भरती झाले होते. सेवाकाळात त्यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. 2010 ते 2014 न्यायमूर्ती जी.ए. सानप यांचे सुरक्षा रक्षक तर 2014 ते 2019 राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी त्यांचे सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावले. पुढे अजितदादा पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा ते सहकाऱ्यांकडे नेहमी व्यक्त करत असत. त्यांची ही इच्छा 2019 साली पूर्ण झाली. विदीप जाधव यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर ते अत्यंत निष्ठेने व जबाबदारीने सेवा बजावत होते. बुधवारी कर्तव्यावर असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. सकाळी मुंबई येथील निवासस्थानावरून बारामतीकडे विमानाने अजितदादा पवार यांच्यासोबत ते रवाना झाले होते. मात्र, प्रवासादरम्यान झालेल्या विमान अपघातात विदीप जाधव यांचे प्राण गेले. या घटनेची माहिती मिळताच तरडगाव येथील त्यांच्या घरी मन हेलावून टाकणारे दृश्य दिसून आले.