महाबळेश्वर : पावसाचे माहेरघर असणार्या महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अवघ्या चारच दिवसात महाबळेश्वर आणि पाचगणी शहराची जलवाहिनी असणारा वेण्णा लेक ओव्हर फ्लो झाला आहे. रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले. वेण्णा लेक भरल्याने महाबळेश्वर व पाचगणीच्या पाणीपुरवठ्याची चिंता दूर झाली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, १ जून ते ६ जुलै सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत महाबळेश्वरमध्ये ५३.५७ इंच पावसाची नोंद झाली आहे. रविवारी सकाळी८.३० पर्यंत तब्बल ७.८० इंच पाऊस झाला. त्यानंतर रविवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या अवघ्या नऊ तासांत आणखी १५६.४ मिलिमीटर ६.१५ इंच पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अवघ्या ३३ तासात तब्बल १४ इंच पाऊस झाला.
जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने दडी मारल्याने वेण्णा तलावाच्या पाणीपातळीत मोठी घट झाली होती. तलावात अवघा महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने महाबळेश्वर व पाचगणीकरांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र २२ जूननंतर पावसाने जोर पकडला आणि जूनअखेरीस तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तलावाची पाणीपातळी झपाट्याने वाढली.
दरवर्षी साधारण ५० ते ५५ इंच पावसाची नोंद झाल्यानंतर वेण्णा तलाव ओव्हरफ्लो होतो. यंदाही अवघ्या चार दिवसांच्या मुसळधार पावसानंतर ही परंपरा कायम राहिली. तलाव सांडव्यावरून वाहू लागल्याने महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांच्या वर्षभराच्या पाणीपुरवठ्याबाबत दिलासा मिळाला आहे.