यवेलंग : वाई तालुक्याच्या पश्चिम भागात असणार्या वेलंग गावामध्ये महावितरणच्या उफराट्या कारभाराचा एक नमुना समोर आला आहे. मुळात एखाद्या खांबावरील विद्युत वाहक तार ही घरांवरून नेता येत नाही. असे असताना वेलंगमध्ये रहिवास क्षेत्रातील असणार्या घरांवरून तब्बल 22 हजार व्होल्टची उच्चदाब लाईन नेण्यात आली आहे. यामुळे नागरिकांवर मरणाची टांगती तलवार आहे. ही विद्युत वाहक तार लवकरात लवकर काढून दुसरीकडून न्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वेलंग येथे 22 हजार व्होल्टची उच्चदाब लाईन ही (एलटी) लाईन वरून थेट घराच्या छपरावरून टाकण्यात आली आहे. ही थ्री फेज लाईन 22 हजार होल्टेज असलेली लाईन नंतर टाकण्यात आलेली आहे. ती आधीपासून अस्तित्वात असलेल्या एलटी लाईनवरून गेली आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. बरेच वेळा वार्याने तारा हल्ल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या ठिणग्या सुद्धा पडल्या होत्या. याची माहिती महावितरणला दिल्यानंतरही यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.
मुंबई पुण्याकडच्या धनिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंगले व इमारती बांधल्या आहेत. तेथे याच विद्युत वाहिनीद्वारे येथे वीज पुरवठा केला जातो. परंतु, यासाठी सर्वसामान्यांचा जीव टांगणीला लागला आहे. एखाद्यावेळी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. यापूर्वीच्याच उच्च दाब वाहिनीला ग्रामपंचायतीने ठराव करून विरोध करत ही लाईन हटवण्याची मागणी करत ठराव करण्यात आला होता. मात्र आजतागायत या ठरावाला व मागणीला विद्युत वितरण कंपनीने कसलीच दाद दिलेली नाही.
याशिवाय एखाद्याला नवीन घर बांधायचे असल्यास आणि जर एलटी लाईन घराजवळून जात असेल तर कंपनी त्यास बांधकाम परवानगी नाकारते. त्यामुळे अशा धोकादायक एलटी लाईन थेट घरावरून कशी गेली? कोणाच्या आशीर्वादाने ही लाईन टाकण्यात आली? असे सवाल केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासनाने व ऊर्जा विभागाने या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.