वडूज : खटाव तालुक्यातील वडूज शहरात भटकी कुत्री आणि डुकरांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, त्यांचा वावर आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. दोन महिन्यांपूर्वी डुकरांमुळे झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी गेल्यानंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही. गेल्याच आठवड्यात एका सेवानिवृत्त आरोग्य कर्मचार्यासह शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाल्याने, आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
या समस्येच्या मुळाशी कातरखटाव रस्त्यावरील लेंडोरी पुलाजवळ अवैधरित्या टाकण्यात येणारा कचरा आहे. काही चिकन विक्रेते रात्रीच्या वेळी कोंबड्यांची मुंडकी, पाय आणि इतर जैविक अवशेष या परिसरात टाकतात. या घाणीमुळे येथे कुत्री आणि डुकरांचा मोठा वावर असतो, जो थेट अपघातांना निमंत्रण देतो. विशेषतः पहाटे फिरायला जाणार्या नागरिकांना, महिलांना आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. नगरपंचायत प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन भटक्या जनावरांचा आणि रस्त्याकडेला टाकल्या जाणार्या घाणीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
वडूज शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. पाठीमागे कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम केले होते तसेच काम पुन्हा चालू करावे.राजेंद्र माने, सामाजिक कार्यकर्ते
अलीकडच्या काळात वडूज परिसरात मोकाट प्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या प्राण्यांसह घाणीच्या गंभीर प्रश्नावर सोशिक नागरिकांच्या सहन शिलतेचा प्रशासनाने अंत पाहू नये, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष प्रदीप शेटे यांनी दिला आहे.
डुकरांमुळे झालेल्या अपघातात
दोन महिन्यांपूर्वी एकाचा मृत्यू; दोघे गंभीर
कातरखटाव रस्त्यावर टाकल्या जाणार्या
मांसाच्या अवशेषांमुळे जनावरांची गर्दी
प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाविरोधात नागरिकांचा संताप
तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी.