वडूज : भारतीय लष्कराच्या सेवेत असलेले खटाव तालुक्यातील वडूज येथील माधवनगर भागातील जवान चंद्रकांत महादेव काळे (वय 40) हे राजस्थान येथे कर्तव्यावर असताना बुधवारी शहीद झाले.
जवान काळे हे भारतीय लष्करात 18 मीडियम रेजिमेंटमध्ये अटलरी डिपार्टमेंटमध्ये नाईक सुभेदार या पदावर कार्यरत होते. ते 18 मिडियम मराठा तोफखाना रेजिमेंटच्या राजस्थान येथील महाजन फायरींग रेंजमध्ये युध्द अभ्यासाचा सराव घेत होते. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ट्रेनिंग कॅम्पसाठी निघालेल्या सैन्यदलाच्या वाहनाला दुर्घटना घडून जवान काळे शहीद झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, जवान काळे यांनी पंधरा वर्षे लष्करात सेवा बजावल्यानंतर त्यांना वाढीव सेवा देण्यात आली होती. त्यांनी लष्करात 23 वर्षे सेवा बजावली होती. ते शहीद झाल्याचे भारतीय लष्कराकडून गुरुवारी सकाळी त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आले. त्यानंतर अवघ्या शहरावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन बहिणी, एक बंधू असा परिवार आहे.