सातारा : निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्यासाठी आणि वाढत्या लठ्ठपणाला आळा घालण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रलायाने एक निर्णायक पाऊल उचलले आहे. सामोसा, कचोरी, वडापाव, पिझ्झा, फेंच फ्राईज अशा तेलकट आणि गोड पदार्थांमधील तेल व साखरेचे प्रमाण स्पष्ट करणारे डिजिटल पोस्टर सर्व केंद्रीय कार्यालये, कॅन्टीन, कॅफेटेरिया आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी यासंदर्भात सर्व मंत्रालये, विभाग, स्वायत्त संस्था यांना पत्र पाठवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या पुढाकारात दैनंदिन आहारातील साखर आणि चरबीमुळे होणार्या शारीरिक समस्यांकडे जनतेचे लक्ष वेधणे हा मुख्य उद्देश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या पुढाकारात आणखी एक विशेष बाब म्हणजे लेटरहेड, लिफाफे, फोल्डर्स, नोटपॅड यांसारख्या सर्व अधिकृत कार्यालयीन साहित्यावरही आरोग्य संदेश छापण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे प्रत्येक कागदपत्राद्वारे निरोगी जीवनशैलीचा संदेश पोहोचवला जाणार आहे.
मंत्रालयाच्या मते भारतात प्रौढ आणि मुलांमध्ये लठ्ठपणा वेगाने वाढतो आहे. शहरी भागात दर 5 पैकी 1 प्रौढ लठ्ठ आहे. बालवयातच तयार होणार्या खाण्याच्या सवयी याला कारणीभूत आहेत. द लॅन्सेट-जीबीडी 2021 अभ्यासानुसार 2021 मध्ये भारतात 18 कोटी लोकांना वजनाची समस्या होती आणि 2050 पर्यंत हे प्रमाण 44.9 कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, विविध प्रकारचे कर्करोग, मानसिक आरोग्य बिघडणे, हालचाली मर्यादा आणि जीवनमानाचा दर्जा घसरणे यासारख्या अनेक समस्या निर्माण होतात. तसेच आरोग्यावर खर्च वाढतो. उत्पादनक्षमता घटते आणि आरोग्यव्यवस्थेवर ताण येतो.
प्रत्येक कॅन्टीन, कार्यालय, शाळा, बैठक कक्ष आणि लॉबीमध्ये असे पोस्टर लावले जाणार आहे. त्यामध्ये एक सामोसा 17 ग्रॅम फॅट, 2 कचोरी 10 गॅ्रम फॅट, 1 वडापाव 10 गॅ्रम फॅट, 10 भजी 14 गॅ्रम फॅट, 1 गुुलाबजाम 32 ग्रॅम साखर, 1 सॉफ्ट ड्रिंक 32 ग्रॅम साखर, 45 ग्रॅम चॉकलेट 25 ग्रॅम साखर असे पोस्टर लावण्यात येणार आहेत.