मारूल हवेली : उरुल (ता. पाटण) भागात असणारे मोबाईल टॉवर केवळ शोपीस बनले असून, नेटवर्कचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे रिचार्जचे पैसे वाया जात असून ग्राहकांना इंटरनेट सुविधा मिळत नसल्याने मोबाईल देखील शोपीस झाल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मोबाईल हा मानव जीवनाचा आवश्यक घटक बनला आहे. संपर्कासह मोबाईल आज माहिती व मनोरंजनाचे माध्यम बनला असल्याने त्यास लागणार्या नेटवर्कसाठी ग्राहक मोठी किंमत मोजत आहेत. एरव्ही बाजारात एखाद्या वस्तू खरेदी करताना त्या वस्तूत चार पैसे कमी किमतीत कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करतो. मात्र मोबाईल रिचार्ज तोही एक महिना अगोदर पैसे मोजून करत आहेत. तरी सुद्धा सुविधांबाबत मोबाईल कंपनी दुर्लक्ष करत आहे. दरम्यान लोकांना हातातली कामे सोडून नेटवर्कच्या शोधात उंचावर जावे लागत आहे.
उरुल विभागातील मोबाईल नेटवर्क सेवा पूर्णपणे कोलमडली असून मोबाईल टॉवर उशाला अन् कोरड मोबाईलच्या घशाला अशी परिस्थिती भागात झाली आहे. उरुल गावात बीएसएनएल व एअरटेल कंपनीचे वेगवेगळे टॉवर आहेत. एक वर्षापूर्वी एअरटेलने अवघ्या दोन महिन्यात मोबाईल टॉवर उभारुन नेटवर्कचा श्रीगणेशा केला. तो फार काळ टिकला नाही. अवघ्या सहा महिण्यातच एअरटेलची नेटवर्क व्यवस्था कोलमडली असून उरुलचा बीएसएनएल टॉवर निव्वळ शोपिस झाला आहे. एअरटेलचा मोबाईल टॉवर दिसू लागल्याने अनेकांनी मोबाईल सिम पोर्ट केले.
मात्र एक दोन महिने झाले सरळ चाललेले मोबाईल परत मात्र सहा महिण्यातच नेटवर्क अभावी बंद झाल्याने ग्राहकांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे. महिन्याला 300 पासून पुढे 700 ते 1200 रूपयेपर्यंत महिना, तीन महिने व सहा महिन्याचे रिचार्ज फुकट जात असल्याने कंपनीकडे तक्रार करुन दखल घेतली जात नाही.
उरुल विभागात ठोमसे, बोडकेवाडी, पोळाचीवाडी, सनगरवाडी, बौध्द कॉलनी, गणेवाडी, मोरेवाडी, पवारमळासह लहान मोठ्या वस्त्या आहेत. मात्र, हा परिसर मोबाईल सेवेपासून वंचित आहे. दर्जाहीन सेवेमुळे मोबाईल कंपन्याकडून ग्राहकांची लुट थांबणार कधी, असा संप्तत सवाल ग्राहकांमधून विचारला जात आहे. तसेच तातडीने मोबाईल कंपन्यांच्या व्यवस्थापनाने नेटवर्कची सुविधा अद्यावत करावी अन्यथा ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे. प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
विस्कळीत मोबाईल सेवेचा सर्व घटकांवर परिणाम होत आहे. मोबाईल कंपन्यांनी नेटवर्कमध्ये सुधारणा केली पाहिजे. अन्यथा ग्राहकांना अंदोलन करावे लागेल.- दीपक देसाई, उरुल