सातारा

कराड नगरपालिकेला पक्षाच्या अन् बाजार समिती आघाडीतून लढविणार : डॉ. अतुल भोसले

backup backup

कराड; पुढारी वृत्तसेवा : कराड नगरपालिका निवडणूक पक्षीय धोरणानुसार लढवली जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाच्या चिन्हावर आमचे सर्व समर्थक निवडणूक लढवतील. तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी पुरताच हा निर्णय असून सहकारी संस्था मात्र आघाडीच्या माध्यमातूनच लढवल्या जाणार आहेत. त्याचबरोबर आगामी कराड बाजार समितीची निवडणूक स्थानिक आघाडीच्या माध्यमातूनच लढवली जाणार, असल्याची स्पष्टोक्ती भाजपा नेते डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

डॉ. अतुल भोसले यांची गुरुवारी कृष्णा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी फेर निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. अतुल भोसले यांनी आगामी नगरपालिका व कराड बाजार समितीच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

डॉ. अतुल भोसले म्हणाले, कराड नगरपालिका निवडणूक पक्षीय धोरणानुसार लढवली जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थाबाबत पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. कराड नगरपालिकेच्या सर्व 31 जागा भाजपा पक्ष चिन्हावरच लढणार आहे. त्याचबरोबर आगामी जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणूक भाजपा पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था पक्ष चिन्हावरच लढवल्या जाणार असल्या तरी तालुक्यातील सहकारी संस्थाबाबत मात्र आमची वेगळी भूमिका आहे.

कराड बाजार समिती ही शेतकऱ्यांशी निगडीत सहकारी संस्था आहे. यापूर्वी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत शेतकरी हित लक्षात घेत आमदार बाळासाहेब पाटील यांना पाठिंबा देण्यात आला होता. त्यामुळे हीच आघाडी बाजार समितीत कायम ठेवली जाणार असल्याचे संकेत डॉक्टर भोसले यांनी दिले आहेत. कराड बाजार समिती ही सहकारी संस्था असून शेतकऱ्यांशी थेट संबंध येतो. कराड तालुक्यातील सहकारी संस्था पक्षीय पातळीवर लढवल्या जात नाहीत. त्यामुळे कराड बाजार समिती निवडणूक स्थानिक आघाडीच्या माध्यमातूनच लढवली जाईल, असे आपले मत असल्याचे डॉक्टर अतुल भोसले यांनी सांगितले.

त्यामुळेच आगामी बाजार समिती निवडणुकीत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघा मधील राजकीय मतभेद लक्षात घेत डॉक्टर अतुल भोसले यांच्याकडून राष्ट्रीय काँग्रेसला विशेषतः ॲड. उदयसिंह पाटील – उंडाळकर गटाला विरोध केला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्याचवेळी सातारा जिल्हा बँक निवडणुकीप्रमाणे कराड बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या गटाला संपूर्ण सहकार्य करण्याची भूमिका डॉक्टर अतुल भोसले गटाकडून घेतली जाणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आगामी काळात भाजपा व राष्ट्रीय काँग्रेसमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT