Satara Rain Pudhari
सातारा

Satara Rain: अवकाळी पावसाने दाणादाण; ठिकठिकाणी नुकसान

खंडाळ्यात झाडे कोसळली, पत्रे उडाले, गारपीटीने कांदा व कडब्याचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

खंडाळा : खंडाळा शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, सोलर पॅनल तुटले व अनेक शेडवरील पत्रे उडून गेले. अनेक ठिकाणी गारांचा खच पडला. तर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची पावसामुळे तारांबळ उडाली.

बुधवारी दुपारी वादळी वारे आणि गारपिटमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शिवारामध्ये शेतकऱ्यांनी शेतातून काढलेला कांदा, कडबा भिजल्याने नुकसान झाले. पावसामुळे बाजार समितीच्या व्यापारी गाळ्यासमोर पाण्याचे तळे साचले होते. खंडाळा ते हरळी रस्त्यावरील कॅनल परिसरात विद्युत तारा तुटून पडल्या. त्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच महामार्गावर एका हॉटेलसमोरील दुचाकीवर झाड कोसळले. पावसामुळे प्राथमिक शाळेचा पत्रा उडाला असून येथील शामराव बबन यादव यांच्या घराच्या छतावरील सोलर पॅनेल वाऱ्यामुळे उडून गेले. पावसाचा आणि वाऱ्याचा जोर अधिक असल्यामुळे विश्रामगृहाजवळील विद्युत डीपी एका बाजूला झुकला होता. काही ठिकाणी तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. पावसाची उघडीप मिळताच महावितरणकडून रात्री उशिरा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.

दरम्यान, पारगाव - खंडाळा बसस्थानकानजीक सेवा रस्त्यावर पावसामुळे पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले होते. त्यामुळे वाहनचालक त्याचबरोबर नागरिकांना या रस्त्यावर कसरत करावी लागत असल्याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT