साताराः राज्यात गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेत पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मंत्री जाधव-पाटील म्हणाले, नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन संवेदनशील आहे. एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी. यासाठी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी व विभागाने पथके गठीत करून ही कार्यवाही गतीने पूर्ण करावी, अशा सूचना मंत्री जाधव-पाटील यांनी दिल्या आहेत.
मंत्री जाधव पाटील म्हणाले, अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत आहे. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानीपोटी सन २०२३- २०२४ या वर्षात ५४ लाख ८० हजार पात्र शेतकऱ्यांना ४ हजार ८३३ कोटी (चार हजार आठशे तेहसतीस कोटी ) रूपये तर १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत ६९ लाख ३ हजार शेतकऱ्यांना ६ हजार ९८९ कोटी ( सहा हजार नऊशे एकोणनव्वद) आणि १ एप्रिल २०२५ ते २१ मे २०२५ या कालावधीत ९ लाख ७ हजार शेतकऱ्यांना ९७५ कोटी रुपयेची मदत देण्यात आली असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले.