कोरेगाव : इतिहासकाळात आम्ही महाराष्ट्राबाहेर गेलो असलो, तरी या मातीशी आमची नाळ कायम जुळलेली आहे. मी पाहुणा नाही, तर इथला मुखिया आहे. मायभूमीत आल्याचे समाधान वाटते, असे भावूक उद्गार केंद्रीय दूरसंचारमंत्री ना. ज्योतिरादित्य शिंदे यांनी कण्हेरखेड (ता. कोरेगाव) येथे काढले. आपल्या मूळगावी सोमवारी केंद्रीय मंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी सदिच्छा भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ना. शिंदे यांच्या पत्नी सौ. प्रियदर्शनीराजे शिंदे, युवराज महाआर्यमानराजे शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मनोजदादा घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना करत सुरुवातीला अवघे 20 किल्ले असताना पराक्रमाची शर्थ केली. गनिमी काव्याने अत्यंत कमी काळात 365 किल्ल्यांचे स्वराज्य विस्तारित करण्याचे सामर्थ्य असणार्या छत्रपती शिवरायांकडे होते. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून अनेक सरदारांनी अटकेपार घोडदौड केली. इथल्या वाड्याचा दगड आणि दगड पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजीराजे यांच्या संकल्पनेतील स्वराज्य पुढे नेण्याचे काम अनेक सरदारांनी केले. त्यात शिंदे घराण्याचे योगदान बहुमोल आहे. ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ या दत्ताजी शिंदे यांच्या रणसंग्रामावरील प्रसंगाची आठवण करून देत असतानाच दहा वर्षांनंतर पानिपतच्या रणसंग्रामास तोडीस तोड उत्तर देऊन मोघलांना धडा शिकवण्याची धमक शिंदे परिवारातील दिग्गजांनी दाखवली असल्याचेही सांगितले.
ना. शिवेंद्रराजे म्हणाले, ना. ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील स्व. माधवराव शिंदे, आजी स्व. विजयाराजे शिंदे यांच्याशी स्व. अभयसिंहराजे भोसले व आजी स्व. सुमित्राराजे भोसले यांचे वैचारिक आणि भावनिक नाते होते. कण्हेरखेडच्या सुपुत्रांनी राज्याबाहेर गाजवलेला पराक्रम वंदनीय आहे. पराक्रमी सरदार घराण्यांची शिवछत्रपतींवर श्रद्धा असल्यामुळे शिवस्वराज्य अटकेपार पोहोचले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ना. शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच प्रा. डॉ. पी. एन. शिंदे लिखित महादजी शिंदे चरित्र ग्रंथाचेही पूजन करण्यात आले. शिंदेशाही पगडी, तलवार, शाल व पुष्पगुच्छ देऊन संपूर्ण शिंदे परिवाराचे ग्रामस्थांतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीसह विविध संस्था, संघटनांतर्फे ना. शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी दूरसंचार खात्याचे केंद्रीय मंत्री असलेल्या ना. शिंदे यांनी स्थानिक टपाल कार्यालयात सदिच्छा भेट दिली. माजी सरपंच दुष्यंतराजे शिंदे यांनी प्रास्ताविक केले. आ. मनोजदादा घोरपडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हा नियोजन समिती सदस्य सौ. दीपिका शिंदे, सरपंच सौ. सारिका शिंदे, उपसरपंच अजित पवार, अॅड. विजयसिंह शिंदे, अॅड. जयदीप शिंदे, चेअरमन केशव शिंदे, माजी सरपंच संभाजीराव शिंदे, संजय शिंदे, दीपक शिंदे, दत्तात्रय भोसले, संतोष जाधव, सचिन शिंदे, अमर शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ना. ज्योतिरादित्य शिंदे, सौ. प्रियदर्शनी शिंदे व युवराज महाआर्यमानराजे यांनी कण्हेरखेड गावांमध्ये प्रवेश करताच गावच्या कमानीसमोर आपल्या मायभूमीच्या चरणी माथा टेकवला व कण्हेरखेडची माती आपल्या कपाळी लावली. आपल्या गावाविषयीची ही कृतज्ञता उपस्थितांना विशेष भावली. यानंतर त्यांनी ग्रामदैवताचे दर्शन घेतले. यानंतर ना. शिंदे यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.